Thursday, June 13, 2024
Homeक्राईम न्यूजजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली; पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान अनधिकृत...

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली; पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान अनधिकृत होर्डिंग जैसे थे

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

लोणी काळभोर, (पुणे) : घाटकोपर नंतर पुण्यातील मोशी व लोणी काळभोरमध्ये अनधिकृत होर्डिंग कोसळल्याच्या घटना घडल्या होत्या. या पाश्वभूमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी अनधिकृत होर्डिंग काढून टाका. तसेच मालक व फ्लेक्स लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

मात्र, पुणे सोलापूर महामार्गावरील हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान असलेल्या अनधिकृत होर्डिंग मालक व चालकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. अनधिकृत होर्डिंगवरील फ्लेक्स काढले आहेत. मात्र लोखंडाचा सांगाडा तसाच धोकादायकरीत्या लटकलेल्या अवस्थेत ठेवला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी काळभोर (ता. हवेली) येथील गुलमोहर लोन्स येथे अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे महाकाय होर्डिंग 18 मे ला कोसळले होते. या अपघातात तिघेजण जखमी झाले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले असून अनधिकृत होर्डिंग काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

हडपसर ते उरुळी कांचन दरम्यान पुणे सोलापूर महामार्गाच्या दोन्ही बाजूला ५०० हून अधिक अनधिकृत होर्डिंग लावण्यात आले आहेत. या अनधिकृत होर्डिंगच्या जागा मालक व चालकाने एक क्लुप्ती केली आहे. होर्डिंगवरील फ्लेक्स काढून टाकला आहे. मात्र, होर्डिंगचा लोखंडी सापळा धोकादायकरीत्या तसाच लटकलेल्या अवस्थेत ठेवला आहे. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणारे पादचारी व वाहनचालक यांच्या जीवाला अपघाताचा धोका वाढला आहे.

दरम्यान, अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग पडल्याच्या तीन घटना घडल्या आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे व पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी अनधिकृत होर्डिंग काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनांचे अंमलबजावणी होत नसल्याने केवळ या सूचना कागदावरच राहिल्या आहेत. अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

होर्डिंगचा लोखंडी सांगाडा निघणार कधी?

पूर्व हवेलीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग आहेत. जागा मालकांनी युक्ती करून फ्लेक्स काढला आहे. मात्र होर्डिंग चा लोखंडी साचा तसाच धोकादायकरीत्या लटकलेल्या अवस्थेत ठेवला आहे. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे होर्डिंगचा लोखंडी सांगाडा निघणार कधी? असा सवाल नागरिकांनी केला आहे.

कारवाई कधी ?

जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था कारवाईच्या नावाखाली केवळ कागदी घोडे नाचाविल्याचे समोर येत आले. त्यामुळे अनधिकृत होर्डिंगचा जागा मालक व चालकाचे फावले आहे. अनधिकृत होर्डिंगवर प्रशासनाच्या वतीने कारवाईची बडगा का उगारला जात नाही? असा सवाल नागरिकांनी केला आहे. तसेच होर्डिंगचा जागा मालक व चालकांवर कारवाई कधी होणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग कोसळून 18 जणांचा मृत्यु झाला होता. तर 75 हून अधिक जण जखमी झाले होते. लोणी काळभोर येथीलही दुर्घटनेत तिघेजण जखमी झाले होते. सुदैवाने मोशी घटनेत केवळ वाहनांचे नुकसान झाले होते. हडपसर, शेवाळेवाडी, मांजरी कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचन परिसरात अनधिकृत होर्डिंग नागरी वस्तीत आहेत. होर्डिंग च्या खाली टपऱ्या, दुकाने, हॉटेल, हातगाड्या मोठ्या प्रमाणात लागलेल्या आहेत. भविष्यात अनधिकृत होर्डिंगचा सांगाडा कोसळून अजून एखादी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण? याची हमी कोण घेणार? असा सवाल नागरिकांनी केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments