इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुण्यातुन धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे जमिनीच्या वादातून पुतण्याने काकावर गोळी झाडल्याची घटना घडली आहे. मात्र, गोळी कानापासून गेल्यामुळे काकाचा जीव वाचला आहे. ही घटना पुण्यातील ढोकळवाडी वारक येथे घडली आहे. सोपान चिंधु ढोकळे असं गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर नवनाथ ढोकळे असं पुतण्याचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोपान ढोकळे यांची वडिलोपार्जित शेती आहे. मागील काही दिवसांपासून याबाबत ढोकळे कुटुंबामध्ये वाद होता. काही दिवसांपूर्वी सोपान ढोकळे यांनी शेतामध्ये पत्र्याचा शेड बांधला होता. त्यांचा पुतण्या नवनाथ ढोकळे याला मात्र ज्या जागेवर शेड बांधलं होतं त्याचा मनात राग होता. बांधलेले शेड काढून टाकावे, यावरून त्यांच्यात वाद सुरु होता.
दरम्यान, रागातून पुतण्या नवनाथ याने त्याच्याजवळ असणाऱ्या छऱ्याच्या बंदुकीतून काका सोपान ढोकळे यांच्यावर गोळी झाडली. सुदैवाने, गोळी त्यांच्या डोक्याला लागली नाही. मात्र, गोळी कानाजवळून गेल्याने कानाला मोठ्या प्रमाणात जखम झाली आहे. त्यानंतर ढोकळे यांना तातडीनेजवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले.
सोपान ढोकळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन छऱ्याची बंदूक ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी पुतण्या नवनाथ नामदेव ढोकळे याच्यावर गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.