इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात बनावट मृत्यू दाखला तयार केल्याचा प्रकार समोर होता. याप्रकरणी दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना अटक केली होती. यामध्ये जबाबदार असलेल्या महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे या प्रकरणातील गूढ कायम राहिले आहे.
रामकुमार ब्रह्मदत्त अग्रवाल (रा. कॅम्प, पुणे) यांनी त्यांच्या मालकीची रायगड, तालुका श्रीवर्धन, कार्ले येथील ४० गुंठे जमिनीच्या व्यवहारात फसवणूक झाल्याप्रकरणी दिघी सागरी पोलीस ठाणे (श्रीवर्धन) येथे मार्च २०२३ मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास करताना पुणे महापालिकेत जन्म मृत्यूचे बनावट दाखले देण्याचे रॅकेट सुरू असल्याचे समोर आले.
या गुन्ह्यात आरोपींनी बनावट व्यक्ती रामकुमार अग्रवाल यांच्या नावाने खोटी कागदपत्रे आणि ओळखपत्र तयार करून ती श्रीवर्धनच्या दुय्यम निबंधक कार्यालयात सादर केली. यावरून, जमिनीचे बनावट खरेदीखत तयार करून सातबारा उताऱ्यावर नोंदणी करण्यात आली होती.
तपासादरम्यान रामकुमार अग्रवाल यांचा मृत्यू झाल्याचा दाखला पुणे महापालिकेच्या धनकवडी कार्यालयातून काढल्याचे निष्पन्न झाले. मृत्यूची तारीख २५ मे २०२१ असल्याचे दाखवले गेले, मात्र कार्यालयात् मृत्यूची नोंद १२ एप्रिल २०२४ रोजी करण्यात आल्याचे आढळून आले. या विरोधाभासामुळे, पोलिसांना संशय आला.
महापालिकेच्या धनकवडी कार्यालयाने मृत्यू दाखल्यासंदर्भात कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले आहे. तपासात मृत्यूची नोंद करणारे तत्कालीन उपनिबंधक डॉ. अमित शहा, अधिकारी पूनम घरपाळे आणि डाटा एंट्री ऑपरेटर स्वप्नील निगडे व शुभम पासलकर यांचा आर्थिक लाभासाठी या कटात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात आले.