इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
लोणी काळभोर, (पुणे) जबरी चोरी व कॅनॉलवरील इलेक्ट्रीक मोटारची चोरी करणाऱ्या बारामती तालुक्यातील वाणेवाडी व मुरूम येथील दोन सराईत चोरट्यांना, वडगाव निंबाळकर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत बेड्या ठोकल्या आहेत.
विनोद मारूती नामदास (रा. वाणेवाडी ता. बारामती), रोहित विनायक जाधव (रा. मुरूम ता. बारामती) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी सोन्याचे दागिने, टेक्स्मो कंपनीची मोटार, व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा 2 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अशी माहिती वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोढवे येथे रविवारी (ता. 11) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी संजना कांतीलाल शिंदे यांना भोसले वस्ती कोठे आहे, असे विचारून साक्षीदार कुसुम बालगुडे यांच्या डोक्यात चाकुने वार केले व गळ्यातील मनी मंगळसुत्र हिसकावुन घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी फिर्यादी या साक्षीदार यांच्या मदतीला गेले असता आरोपीनी फिर्यादी शिंदे यांना देखील चाकुने मारहाण करून त्या ठिकाणावरून आरोपी पळून गेला. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या तपास करीत असताना गोपनीय माहिती व तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित इसम विनोद नामदास व रोहित विनायक जाधव यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी सदर गुन्ह्याच्या ठिकाणावरून तीन ग्रॅम वजनाचे सोन्याच्या मण्यांची जबरी चोरी केल्याची कबुली दिली.
दरम्यान, दोघांकडे अधिक चौकशी केली असता रोहित जाधव याने मोढवे गावच्या हद्दीत 2022 साली जबरी चोरी तसेच वडगाव निंबाळकर गावच्या हद्दीत 2024 साली निरा डावा कॅनॉलवर इलेक्ट्रीक मोटारची चोरी केल्याचे कबुली पोलिसांना दिली आहे. तसेच तीन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, टेक्स्मो कंपनीची मोटार, व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा 2 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, सदरचे आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन आरोपी विनोद नामदास याच्यावर वडगाव निंबाळकर, जेजुरी, पोलीस ठाण्यात 6 गुन्हे दाखल असून मोटारसायकल चोरीचे गुन्हे ही दाखल आहेत. तर आरोपी रोहित जाधव याच्यावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोटार चोरीचे 15 गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संकपाळ, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कन्हेरे, पोलीस हवालदार रमेश नागटीळक, महेश पन्हाळे, सागर देशमाने, अमोल भोसले, अनिल खेडकर, भाउसाो मारकड, हृदयनाथ देवकर, पोलीस शिपाई पोपट नाळे, तसेच सहायक फौजदार बाळासाहेब कारंडे, स्वप्नील अहिवळे, अभिजीत एकशिंगे स्थानिक गुन्हे शाखा यांनी केलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कन्हेरे हे करीत आहेत.