इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः चांदीच्या अंगठ्यांना सोन्याचा मुलामा लावून त्या सराफाकडे गहाण ठेऊन फसवणूक केल्याप्रकरणी चौघांना चंदननगर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली रिक्षा, बनावट अंगठ्या व बनावट हॉलमार्क बनविण्याचे साहित्य असा एकुण 1 लाख 2 हजार 875 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ओमप्रकाश शामसुंदर परदेशी (वय 58, रा. वडगावशेरी), फय्याज चांद सय्यद (वय 35, रा. वडगाव शेरी), आरिफ खलील शेख (41, रा. येरवडा), शरण माणिकराव शिलवंत (46, रा. धनकवडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर मुकेश रामदास वैष्णव (वय-35, रा. वडगावशेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश वैष्णव यांचे वडगावशेरी परिसरात सराफी पेढी आहे. त्या दुकानात दोघांनी येवून चार सोन्याच्या मुलामा असलेल्या अंगठ्या गहाण ठेवून एक लाख रुपये घेतले होते. या अंगठ्या बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. तांत्रिक तपास करुन आरोपी परदेशीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत परदेशीच्या साथीदारांची नावे निष्पन्न झाली आहेत.
दरम्यान, आरोपी शेख हा शिलवंत याच्याकडून या बनावट अंगठ्या घेत होता. परदेशी आणि सय्यद या अंगठ्या सराफ व्यावसायिकांकडे गहाण ठेवून फसवणूक करत होते. आरोपींनी अशा पद्धतीने शहरातील आणखी काही सराफ व्यावसायिकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे, दत्तप्रसाद शेंडगे, पोलीस कर्मचारी विश्वनाथ गोणे, सचिन रणदिवे, शिवाजी धांडे, विकास कदम, नामदेव गडदरे, शेखर शिंदे, ज्ञानोबा लहाने यांनी ही कामगिरी केली.