इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुणे शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरपोच मागविवण्यात आलेल्या चॉकलेट शेकमध्ये उंदीर आढळून आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांकडून चॉकलेट शेक देणाऱ्या कॅफे मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, एका कॅफे मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणाच्या मैत्रिणीने १४ फेब्रुवारी रोजी विश्रांतवाडी भागातील एका कॅफेतून चॉकलेट शेक मागविला होता. तिने घरपोच खाद्यपदार्थ देणाऱ्या एका अॅपवर नोंदणी करून चॉकलेट शेक मागविला होता. तरुणी लोहगाव भागात वास्तव्यास आहे. चॉकलेट शेक घेऊन रात्री एक कामगार तरुणीच्या घरी आला. तरुणीने चॉकलेट शेक घेतला. तिने चॉकलेट शेक पिण्यापूर्वी ग्लास पाहिला. तेव्हा शेकमध्ये मृतावस्थेतील उंदीर आढळून आला. या घटनेनंतर तरुणीने तिच्या मित्राला याबाबतची सर्व माहिती कळवली.
त्यानंतर तरुणाकडून संबंधित कॅफे मालकाशी संपर्क साधून विचारपूस करण्यात आली. तेव्हा कॅफे मालकाने तरुणाला धमकावले. चॉकलेट शेक तयार करताना मिक्सरमध्ये उंदिराचे पिलू पडले. खाद्यपदार्थ तयार करताना पुरेशी काळजी न घेता ग्राहकांच्या जिविताला धोका होईल, असे कृत्य कॅफे मालकाने केल्याचे तरुणाने फिर्यादीत म्हटले आहे. विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय चंदनशिव यांनी कॅफेला भेट दिली. तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हवालदार ए. एस. आदलिंग तपास करत आहेत.