इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यातील वाघोली परिसरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केला. त्यानंतर घरचे खालच्या जातीची मुलगी सून नको असे म्हणत असल्याचे सांगून लग्नाला नकार दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका तरुणावर लोणीकंद पोलिसांनी अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत वाघोलीतील एका २३ वर्षीय तरुणीने लोणीकंद पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अभिषेक संजय मगर (वय-२३, रा. पातरवाला बुद्रुक, ता. अंबड जि. जालना) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डिसेंबर २०२३ ते ७ एप्रिल २०२४ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या मागासवर्गीय असल्याचे माहिती असतानाही आरोपी अभिषेक याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तो दर दोन तीन महिन्यांनी फिर्यादीला पैसे मागू लागला. पैसे कमी दिल्यास किंवा पैसे देण्यास नकार दिल्यावर शिवीगाळ तसेच हाताने मारहाण करत होता.
दरम्यान, अभिषेक फिर्यादी यांना आपल्या मुळ गावी घेऊन निघाला होता. त्यावेळी गाडी रस्त्यात थांबवून तो फिर्यादीला म्हणाला की, आपल्या घरात खालच्या जातीची मुलगी सून नको, असे माझ्या घरच्यांनी सांगितले आहे. तरी ते तुला घरात घेणार नाहीत, तू इथुन निघून जा, असं म्हणत तिला गाडीतून ढकलून दिले. त्यानंतर फिर्यादी या पुण्यात आल्या. त्यानंतर त्यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनावणे तपास करीत आहेत.