Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते निर्मल दिंडीचा शुभारंभ

ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते निर्मल दिंडीचा शुभारंभ

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक येत असल्याने वारी स्वच्छ, निर्मल व सुरक्षित व्हावी, यासाठी शासन प्रयत्नशील असून निर्मल वारीसाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीष महाजन यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित निर्मल दिंडीच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, विभागीय उपायुक्त वर्षा लड्डा, विजय मुळीक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र ही साधुसंतांची भूमी आहे. संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी धार्मिक विचारांसोबत स्वच्छतेचा आणि सामाजिक संदेशही दिला. निर्मल वारीच्या निमित्ताने हाच संदेश सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मंत्री गिरीष महाजन म्हणाले.

आषाढी वारीसाठी राज्यभरातून पालखी सोहळ्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. शासनाने वारकऱ्यांच्या व्यवस्थेसाठी पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. निर्मल वारीसाठी मागील वर्षीपेक्षा अधिक निधी उपलब्ध करुन दिला आहे. पालखी मार्गावरील गावांना त्रास होऊ नये, रोगराई पसरू नये, यासाठी शासन योग्य ती काळजी घेत असून निर्मल वारीसाठी जिल्ह्यातील स्वयंसेवक, सेवाभावी संस्था, एनसीसी व एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे. संतांनी भजन, कीर्तनाच्या माध्यमातून स्वच्छतेचा, सामाजिक समतेचा संदेश दिला. पालखी मुक्काम व विसावा गावातून प्रस्थान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गाव व परिसराची स्वच्छता करण्याची खबरदारी घ्या. स्वच्छता राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांनी हरितक्रांतीचा संदेश दिला. त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वांनी पालखी मार्गावर वृक्षलागवडीचा संकल्प करावा, असे आवाहन मंत्री गिरीष महाजन यांनी केले. उज्जैनच्या धर्तीवर पंढरपूर व त्र्यंबकेश्वरसह राज्यातील पाच तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भक्तांना सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे. राज्यातील ४९७ ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी आवश्यक सुविधांसाठी प्रत्येकी ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, वारीच्या माध्यमातून सर्वात मोठा सांस्कृतिक सोहळा दरवर्षी पहायला मिळतो. राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक आषाढी वारीसाठी येत असतात. संपूर्ण सोहळा स्वच्छ, निर्मल व सुरक्षित व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याकरिता पुरेसा निधीही उपलब्ध करुन दिला आहे. विविध संतांनी समाजप्रबोधन करताना धार्मिक कार्याला सामाजिक कार्याची जोड कशी द्यावी, याबाबत संदेश दिला. संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सामुहिक स्वच्छतेबाबत संदेश दिला. मंदिर आणि सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवा, कचरा अस्ताव्यस्त फेकू नका, प्लास्टिकचा वापर टाळा, नदी प्रदूषण टाळा असे सांगून स्वच्छ, निर्मल वारीसाठी स्वच्छतेच्या सुविधांचा वापर करावा असे आवाहन डॉ. पुलकुंडवार यांनी केले.

महाराष्ट्राचा मानबिंदू असलेली आषाढी वारी महाराष्ट्राचे वैभव म्हणून ओळखली जाते. संतांनी समाजाची मने निर्मल केली. त्यांच्या कार्याच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्त्व समाजाला सांगितले. संतांचा संदेश समोर ठेवून निर्मल वारीची सुरूवात करण्यात आली आहे. निर्मल वारीसाठी मागील वर्षीपेक्षा भौतिक सुविधा वाढविण्यात आल्या आहेत. सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कर्तव्याला सामाजिक जबाबदारीची जोड देत निर्मलवारी यशस्वी करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी निर्मल दिंडीसाठी दिलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. तसेच प्रातिनिधीक स्वरुपात दोन दिंडी प्रमुखांना औषधोपचार कीटचे वितरण करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments