Sunday, May 19, 2024
Homeक्राईम न्यूजगो-ग्रीन योजनेला वीज ग्राहकांची पसंतीः आतापर्यंत 1.84 लाख ग्राहकांची 2.21 कोटींची...

गो-ग्रीन योजनेला वीज ग्राहकांची पसंतीः आतापर्यंत 1.84 लाख ग्राहकांची 2.21 कोटींची बचत, दरमहा बिलात 10 रुपयांची सवलत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

महावितरणच्या गो-ग्रीन योजनेत सहभागी होऊन वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत पश्चिम महाराष्ट्रातील आतापर्यंत 1 लाख 84 हजार 220 वीज ग्राहकांनी केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडला असून त्यांची तब्बल 2 कोटी 21 लाख रूपयांची वार्षिक बचत होत आहे. तर या योजनेत पुणे परिमंडळातील 1 लाख 23 हजार वीज ग्राहकांनी राज्यात सर्वाधिक संख्येने गो-ग्रीन योजनेत सहभाग घेतला आहे.

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेनुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात 10 रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वार्षिक 120 रुपयांची वीजबिलांमध्ये बचत होत आहे. वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते ‘गो-ग्रीन’मधील ग्राहकांना ‘ई-मेल’द्वारे पाठविण्यात येत आहे. सोबतच ‘एसएमएस’द्वारे देखील वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटचा त्वरीत लाभ घेणे आणखी शक्य झाले आहे.

दिवसेंदिवस पर्यावरणात प्रतिकूल बदल होत आहे. त्यामुळे पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी ‘गो-ग्रीन’ योजना ही काळाची गरज झाली आहे. वीजबिलाची सॉफ्ट कॉपी जतन करून ज्यावेळी आवश्यकता असेल तेव्हा वीजबिलाची कागदी प्रिंट काढता येते. त्यामुळे कागदी मासिक बिलाचा वापर बंद करून गो-ग्रीन योजनेत वीजग्राहकांनी सहभागी व्हावे असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.

पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत राज्यात पुणे परिमंडलाने गो-ग्रीन योजनेत सर्वाधिक आघाडी घेतली आहे. पुणे परिमंडळातील 1 लाख 23 हजार 403 वीज ग्राहक या योजनेच्या माध्यमातून 1 कोटी 48 लाख 8 हजार 360 रुपयांची वार्षिक बचत करीत आहे. तर बारामती परिमंडल अंतर्गत 33 हजार 738 वीजग्राहक 40 लाख 48 हजार 560 रुपयांची बचत करीत आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 12 हजार 977, सातारा जिल्ह्यातील 12 हजार 190 आणि बारामती मंडलमधील 8 हजार 571 ग्राहकांचा समावेश आहे. तर कोल्हापूर परिमंडलातील 27 हजार 79 ग्राहक या योजनेतून 32 लाख 49 हजार 480 रुपयांची बचत करीत आहे. यामध्ये कोल्हापूर 16 हजार 615 आणि सांगली जिल्ह्यातील 10 हजार 464 ग्राहकांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments