इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
लोणी काळभोर, (पुणे) : गोध्रा येथील हत्याकाडांत जन्मठेपेची शिक्षाझाली असताना पॅरोल रजेवर आलेला कैद्याने कारागृहात परत न जाता टोळी बनवली. महाराष्ट्र राज्यात लुटमार करणाऱ्या 5 जणांच्या या टोळीला आळेफाटा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर त्यांचा एक साथीदार फरार झाला आहे. या कारवाईत पोलिसांनी गुन्हा करताना वापरलेला आयशर टेम्पो तसेच गुन्ह्यात चोरीला गेलेला 14 लाख 40 हजार 878 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सलीम ऊर्फ सलमान युसुफ जर्दा (वय 55), साहील हनीफ पठाण (वय- 21), सुफीयान सिकंदर चॅदकी (वय 23), आयुब इसग सुनठीया (वय- 29), इरफान अब्दुल हामीद दुरवेश (वय- 41, सर्व रा. गोध्रा पंचमहाल, गोध्रा, गुजरात) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर आळेफाटा, मंचर, सिन्नर, गोध्रा, राव पुरा, साबरमती (गुजरात), देलवाडा (राजस्थान) येथे 16 गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ गायकवाड (वय 30, रा. पंढरपूर) हे ७ जानेवारीला आयशर टेम्पोमध्ये भिवंडी येथील जेके टायर्स अँड इंडस्ट्रीयल लिमिटेड या कंपनीच्या गोदामातून 165 टायर घेऊन सोलापूरला निघाले होते. पहाटे त्यांना झोप लागल्याने ते आळेफाटा परिसरातील आणे गावाजवळील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या आतील मोकळ्या जागेत टेम्पो लावून झोपी गेले. ते सकाळी सात वाजता उठले, तेव्हा त्यांच्या टेम्पोच्या पाठीमागील ताडपत्री व रस्सी तोडून गाडीच्या आतील लहान 18 व मोठे 22 टायर असा 2 लाख 49 हजार 622 रुपयांचा माल चोरुन नेला होता.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांना मंचर व सिन्नर पोलीस ठाण्यांमध्येही अशाच प्रकारे ढाबे व पेट्रोलपंपावर थांबलेल्या ट्रक, टेम्पोची ताडपत्री फाडून माल चोरुन नेल्याचे गुन्हे दाखल असल्याचे समजले. या गुन्ह्यांचा अभ्यास केल्यानंतर असे गुन्हे करणारी टोळी गुजरातमधील गोध्रा येथील असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणातून या टोळीच्या टेम्पोचा क्रमांक मिळविला. त्यांचा शोध घेत असताना आयशर टेम्पो चांदवड येथे आरोपींसह मिळाला.
दरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सलीम ऊर्फ सलमान जर्दा हा गोध्रा हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. त्याला आजन्म कारावासाची शिक्षा झाली आहे. शिक्षा भोगत असताना तो पॅरोल रजेवर बाहेर आला. त्यानंतर रजा संपल्यावर कारागृहात न जाता त्याने टोळी बनवली. त्यानंतर तो अशा प्रकारे चोऱ्या करीत होता.
आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, सहायक फौजदार चंद्रा डुंबरे, पोलीस हवालदार विकास गोसावी, विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित पोळ, पोलीस अंमलदार अमित माळुंजे, नविन अरगडे, सचिन रहाणे, ओंकार खुणे, गणेश जगताप यांनी केली आहे.