इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये मंगळवारी एका २६ वर्षीय तरूणीवर सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे या नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर अजूनही आरोपी दत्तात्रय गाडे हा फरार आहे. अद्याप आरोपिला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. या घटनेनंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट बस डेपोला भेट दिली, त्यावेळी त्यांचा ताफा तृप्ती देसांईकडून अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यावेळी देसाईंसह त्यांच्या सहकाऱ्यांना पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे.
तृप्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट बस डेपोला भेट दिली असता तृप्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी त्या म्हणाल्या, स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला अजून अटक केली जात नाही. जे लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेतलं जात आहे. तब्बल ५० तासानंतर योगेश कदम घटनास्थळी आले आहेत. त्यांना भेटून राज्यात काय चाललंय विचारायचं होतं. मात्र येथे मला अडवलं जातंय. गाडे सारखा साधा आरोपी सापडत नसेल तर कसली यंत्रणा आहे.
तृप्ती देसाई म्हणाल्या..
पुढे म्हणाल्या, “आरोपिला पकडण्यासाठी एक लाखाचं बक्षीस जाहीर केलं जातं. पोलिसांना लाखो रुपये पगार मिळतो, फुकट मिळतो का?. पोलीस निष्क्रीय आहेत. आतापर्यंत राजकीय दबावानं अनेक प्रकरणं दाबली गेली आहेत, या प्रकरणात राजकीय दबाव आहे की नाही माहीत नाही. आरोपी गाडे सरेंडर होण्याची वाट बघता का?. आज सगळ्या महिला, मुलं मुली येथे आहेत, सर्वजन घाबरत आहेत. ५० टक्के प्रवास मोफत मिळतो म्हणून एसटीत महिला सुरक्षितपणे प्रवास करतात. आता मात्र तिथंही महिला सुरक्षित नाहीत. अशी संतप्त प्रतिक्रिया तृप्ती देसाई यांनी दिली आहे.
नाहीतर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल..
तृप्ती देसाई म्हणाल्या, गृह राज्यमंत्री योगेश कदम घटनास्थळी आले आहेत. तुम्ही आरोपीला घेऊन या, हे पुणे पोलिसांचं अपयश आहे, पुण्यात कोयता गँग आहे, गाड्या जळत आहेत, पुणे पोलीस या सर्व प्रकरणात पूर्णपणे अपयशी ठरत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ आरोपीला ताब्यात घ्यावं. अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. अशी आक्रमक भूमिका तृप्ती देसाई यांनी घेतली आहे.