इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
सासवड, (पुणे) : सासूच्या त्रासाला कंटाळून एका 30 वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. नीरा (ता. पुरंदर) येथे ही घटना घडली आहे.
नीता सचिन निगडे (वय 30, रा. नीरा, ता. पुरंदर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे तर विजया भगवान निगडे (वय 55, रा. निरा, ता. पुरंदर असे सासूचे नाव आहे. या प्रकरणी सासू विजया निगडेला जेजुरी पोलिसांनी अटक केली असून सासवड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली त्यामुळे सासूची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. याप्रकरणी मयत विवाहितेचे वडील सुभाष शंकर माने (रा. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर) यांनी जेजुरी पोलीसात तक्रार दिली आहे.
जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नीताची सासू विजयाही नीता यांना वेळोवेळी लाथा बुक्क्यांनी मारहाण करणे, सारखी शिवीगाळ करणे, घरची गरिबी असल्याने सारखे टोचून बोलणे, हिणवणे, मुलगा होत नव्हता तेव्हा घालून पाडून बोलणे. नीताच्या साड्या जाळून टाकणे. अशा प्रकारचा त्रास देत होती.
काही दिवसांपूर्वी त्यांनी नवीन फ्लॅट बुक केला. तेथे राहायला जाण्याअगोदर माहेरून एक लाख रुपये घेऊन ये असा तगादा लावला होता. मात्र नीता यांच्या माहेरची परिस्थिती पैसे देण्यासारखी नव्हती. अशा प्रकारच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून नीता यांनी राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढून योग्य ती कायदेशीर कारवाई करू, असे आश्वासन दिले त्यानंतर अंत्यविधी करण्यात आला. नीता व सचिन यांना दोन मुली व एक लहान अडीच वर्षाचा मुलगा आहे. सचिन यांचा व्यवसाय आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नव्या फ्लॅटमध्ये निगडे कुटुंब राहायला जाणार होते.