इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पालघर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशातच आता पालघरमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पैशाच्या वादातून सासऱ्याने जावयाची कुऱ्हाडीने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. गाढ झोपेत असताना कुऱ्हाडीने सपासप वार करून जावयाची हत्या केल्यानंतर आरोपी पळून गेला असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती नोकरी देण्याचे आश्वासन देऊन लोकांकडून पैसे उकळत होता, त्याने सासऱ्याकडून देखील असेच पैसे घेतले होते. दोन महिन्यापूर्वी दोघांमध्ये पैशावरून वाद झाला. त्यानंतर आरोपीने त्याच्या जावयावर विळ्याने हल्ला केला होता. हल्ल्यानंतर पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. मात्र, सोमवार-मंगळवारच्या रात्री आरोपी हा जावयाच्या घरी पोहोचला. त्यावेळी घरी जावई गाढ झोपेत असतानाच आरोपीने त्याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला आणि तेथून लगेच पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे.
दरम्यान या घटनेतील मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1) खून अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. सध्या पोलीस आरोपी सासऱ्याचा शोध घेत आहेत.