इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : गांजा विक्रीकरणाऱ्या सराईतास वानवडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई सराईत हडपसरकडे जात असताना करण्यात आली. त्याच्याकडून 60 हजार रुपये किंमतीचा 3 किलो 58 ग्रॅम गांजा, 10 हजारांचा मोबाईल फोन आणि 80 हजारांची एक मोपेड जप्त करण्यात आली आहे. शैलेश शंकर सूर्यवंशी (वय 35, रा. रामटेकडी, हडपसर) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाकडून सराईतांची तपासणी करण्यात येत होती. यावेळी दुचाकीस्वार सराईत सूर्यवंशी हा गंगाधाम चौकातून हडपसरकडे निघाला असुन त्याच्याकडे गांजा असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अमोल गायकवाड आणि गोपाळ मदने यांना खबऱ्याकडून मिळाली. माहिती मिळाल्यानंतर रामटेकडीतील पुलावर पोलिसांनी सापळा रचला. सूर्यवंशी तेथून जात असताना दुचाकी अडवून त्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर दुचाकीची डिक्की उघडून बघितली असता त्यामध्ये पोलिसांना गांजा आढळून आला. पोलिसांनी 60 हजार रुपयांचा 3 किलो 58 ग्रॅम गांजा जप्त केला. तसेच त्याची दुचाकी आणि मोबाईल फोनही पोलिसांनी जप्त केला आहे.
त्यानंतर सूर्यवंशी याच्याविरुद्ध अमली पदार्थ विक्री प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वीही त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ विक्री प्रकरणी गुन्हे दाखल झाले होते.
सदर कारवाई परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजीत आदमाने, गुन्हे शाखेचे निरीक्षक गोविंद जाधव, उपनिरीक्षक धनाजी टोणे, दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अमोल गायकवाड, विष्णू सुतार, गोपाळ मदने, अभिजीत चव्हाण, यतीन भोसले, बालाजी वाघमारे यांनी केली.