इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
बीड: बीड मधून एक बातमी समोर आली आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले याला वन्यजीवांची शिकार आणि दोन व्यक्तींना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मात्र, राजकीय वरदहस्त असलेल्या खोक्या भाईला पोलिसांकडून व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जात असल्याची माहिती समोर आली आहे. बीडच्या जिल्हा कारागृहाबाहेर गुंड सतीश भोसले उर्फ खोक्या याला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आल्यामुळे आता ठाणेदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत विनोद सुरवसे आणि कैलास खटाणे या दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी की, बीड पोलिसांकडून खोक्याला व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जात असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याला बीड पोलिसांनी जेलबाहेर आणल्याचे दिसत आहे. या व्हिडीओत खोक्या बिनधास्त मोबाईलवर बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोमवारी दुपारीचा असल्याची प्राथमिक माहिती आहे. बीड पोलिसांकडून खोक्या सारख्या गुंडाला शाही वागणूक दिली जात असल्याने पोलीस दलाच्या कर्तव्याबाबत पुन्हा एकदा संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
खोक्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता बीड पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये इतर काही अधिकारी दोषी आढळल्यास कारवाई करणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.