इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुणे शहरातील वानवडी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या एका परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षकाची हप्तेखोरी उघडकीस आली आहे. हॉटेलमध्ये हुक्का चालू ठेवण्यासाठी प्रत्येक महिन्याला 20 हजार रुपयांचा हप्ता हे अधिकारी घेत होते. एवढेच नाही, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हुक्क्याबाबत कारवाई करण्याच्या सूचना दिल्यानंतर पोलीस तिथे पोहचण्यापूर्वीच ही माहिती ते संबंधित हॉटेल चालकाला कळवत होते.
दरम्यान, हा प्रकार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले. विशाल पवार असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी पवार यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.
पुणे शहरात अवैध पद्धतीने सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार लुल्लानगर येथील विजेता रुफटॉप हॉटेलवर कारवाई करण्यात आली होती. यावेळी दरम्यान हॉटेल चालकाचा याचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला होता. व्हॉट्सअॅप आणि कॉल हिस्ट्री चेक केली असता, त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पवार यांचा मोबाईल क्रमांक सेव्ह असल्याचे निदर्शनास आले. तसेच, दोघांनी एकमेकांना कॉल केल्याचे निष्पन्न झाले.
हॉटेल चालकाकडे याबाबत चौकशी केली, तेव्हा त्याने जबाबात सांगितले की, पवार यांचा कॉल आणि मेसेज आला होता. त्यामुळे सतर्क होऊन हुक्का बंद करत असताना पोलिसांची रेड झाली. पवार यांना महिन्याला 20 हजार रुपये देत असल्याचे देखील त्याने सांगितले.
प्रशिक्षण कालावधीत देखील खाबूगिरीसाठी सतर्क
पोलीस उपनिरीक्षक पवार यांना 1 डिसेंबर 2024 रोजी वानवडी पोलिस ठाण्यातून अकरा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी कार्यमुक्त करण्यात आले होते. तेथे प्रशिक्षणासाठी असताना देखील वरिष्ठांनी कारवाईसंदर्भात मोबाईलवर टाकलेला मेसेज हॉटेल चालकाला पाठवून पोलीस कारवाई होणार असल्याबाबत सतर्क केले.
वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचा अवमान करून पोलीस खात्याची शिस्त आणि घेतलेली शपथ विसरून पोलिस खात्याची प्रतिमा मलिन होणारे वर्तन केल्याचा ठपका ठेवत पवार यांना निलंबित करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.