इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
वर्धाः जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. तुमच्यावर कुणीतरी जादुटोणा करून तुमचा पाय खराब केला आहे. असे सांगून आपल्या कडे असणाऱ्या अलौकिक शक्तीनेतुमचं पायाचा आजार दुरूस्त करून देतो, असा दावा करत वर्ध्यात एका भोंदूबाबाने वर्ध्यातील एका व्यक्तीची तब्बल 50 हजार रुपयांनी फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सलाउद्दीन अब्दुल हफीज, अजीनन अब्दुल हाफिस दोघेही (रा. बुंदी राजस्थान), सायरा बानो शरीफ (रा. बुंदी राजस्थान) या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सुदामपुरी येथील ६५ वर्षीय प्रकाश शिंदे नावाच्या व्यक्तीला दोन वर्षांपासून उजव्या पायाच्या गुडघ्याचा त्रास होता. त्यामुळे त्यांनी नागपूर येथील सेवाग्राम येथे त्यांनी उपचार केले होते. मात्र त्यातून ते बारे झाले नाहीत. दरम्यान एका अनोळखी इसमाने तुमच्या पायाची गुडघेदुखी वर उपचार करतो. माझ्याकडे असलेल्या अलौकिक शक्तीने तुम्ही बारे व्हाल अशी बतावणी करून ५० हजार रुपयांची मागणी केली. विशेष म्हणजे प्लास्टिक नळीतून त्याने उपचार करण्यास सुरुवात केली. त्याने रबरी नळीने शरीरातून काढलेल्या अशुद्ध रक्ताच्या प्रत्येक घोटाचा खर्च अडीच हजार रुपये असल्याचे सांगून सत्तावीस घोट काढले होते. उपचारानंतर तब्बल पन्नास हजार रुपये पीडित व्यक्तीकडून उकळले. पण उपचारानंतर पीडित शिंदे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
या प्रकारानंतर दुसऱ्यावेळी पुन्हा तशाच प्रकारचा व्यक्ती त्यांच्या घराजवळ आला. पहिल्या अनुभवातून शिंदे यांनी धडा घेतला होता. यांचा दावाही पहिल्या व्यक्तीसारखाच होता. यावेळी त्याच्या सोबत काही महिलाही होत्या. फसवणूक झालेल्या प्रकाश शिंदे यांनी त्यांना घरात घेऊन उपचाराची तयारी झालेली असल्याचे सांगितले आणि पोलिसांना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर हा भोंदू प्रकार समोर आला. या प्रकरणात अगोदर पन्नास हजार रुपये घेऊन पसार झालेल्या भोंदूलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी सलाउद्दीन अब्दुल हफीज, अजीनन अब्दुल हाफिस दोघेही (रा. बुंदी राजस्थान), सायरा बानो शरीफ (रा. बुंदी राजस्थान) या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नागरिकांनी अशा भोंदू बाबांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.