इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुण्याच्या एरंडवणे परिसरातून एक अतिशय हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीला एका व्यक्तीने इतकी मारहाण केली की, त्यात तिचा गर्भपात झाल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी पतीचे नाव रवी (वय 35 वर्षे, रा. एरंडवणे) असे आहे. या गंभीर प्रकरणात पीडित पत्नीने तिच्या क्रूर पतीविरोधात अलंकार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रवी हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असे आणि तिला नेहमी मानसिक व शारीरिक त्रास देत होता. 20 तारीखेला रात्री सुमारे साडेअकरा वाजताच्या सुमारास रवीने गर्भवती पत्नीशी वाद घालण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात त्याने तिला अमानुषपणे मारहाण केली. त्याने पत्नीच्या पोटावर जोराने मारले आणि तिचे केस धरून फरफटत नेत तिला जखमी करत जबर मारहाण केली.
दरम्यान, तातडीने तिला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत, रवीने केलेल्या मारहाणीमुळेच पत्नीचा गर्भपात झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेने एरंडवणे परिसरात आणि संपूर्ण पुणे शहरात संताप व्यक्त होत आहे.