Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजकोल्हापूरच्या कळंबा कारागृहात कैद्यांकडे सापडले मोबाईल

कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात कैद्यांकडे सापडले मोबाईल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : कोल्हापूर शहरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहामधील तब्बल ७५ हून अधिक कैद्यांकडे मोबाईल सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर कैद्यांकडे मोबाईल सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

दरम्यान, कारागृह प्रशासनाने दोन तुरुंग अधिकाऱ्यांसह ११ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. तर, कारागृह अधीक्षक दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांकडे मोबाईल सापडल्याच्या घटना समोर येत होत्या.

त्यामुळे कारागृह प्रशासनाने कैद्यांची तपासणी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १५ कर्मचाऱ्यांचे विशेष पथक नेमले होते. या पथकाने कारागृहातील कैद्यांची झडती घेतली. या तपासणीत महिनाभरात ७५ हून अधिक कैद्यांकडून मोबाईल आणि सिमकार्ड जप्त करण्यात आले. कैद्यांनी बराकीमध्ये आणि स्वच्छतागृहात मोबाईल लपविले होते. याबाबत कोल्हापूर येथील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कळंबा कारागृहात इतक्या मोठ्या प्रमाणावर मोबाईल आणि सिमकार्ड आढळून आले. अतिरिक्त महासंचालक (कारागृह) अमिताभ गुप्ता यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत कर्तव्यात कसूर करणाऱ्या दोन तुरुंग अधिकाऱ्यांसह ११ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कारागृह उपमहानिरीक्षक (पश्चिम) स्वाती साठे यांनी या कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे.

अधिकाऱ्यांवरील बडतर्फीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे

कळंबा कारागृहाचे अधीक्षक पांडुरंग भुसारे यांची येरवडा कारागृहात, तर उपअधीक्षक साहेबराव आडे यांची सोलापूर कारागृहात बदली करण्यात आली आहे. अधीक्षक दर्जाच्या या दोन्ही अधिकाऱ्यांवरील बडतर्फीच्या कारवाईचा प्रस्ताव कारागृह प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठविल्याचे सांगण्यात आले.

बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे

तुरुंग अधिकारी सोमनाथ म्हस्के, सतीश कदम, कर्मचारी तानाजी गायकवाड, अभिजित गोसावी, वैभव पाटील, रवी पवार, अनिकेत आल्हाट, सुहास वरखडे, संजय टिपगुडे, स्वप्नील हांडे, वैशाली पाटील.

कळंबा कारागृहामधील केलेल्या तपासणीत कैद्यांकडे मोबाईल आढळून आले आहेत. या प्रकरणी ११ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. कारागृह प्रशासनाकडून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments