इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुण्यात सोनसाखळी चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मदतीच्या बहाण्याने अपघातग्रस्ताच्या गळ्यातून सोनसाखळी हिसकावली. ही घटना कोंढवा येथे घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्ह्या दाखल करण्यात आला आहे. याबाबत सचिन संजय महाजन (वय ३२ वर्ष, रा. टिळेकरनगर, कोंढवा बु.) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दिलेल्या तक्रारीनुसार अनोळखी व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बुधवारी (दि. १८) रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास टिळेकरनगर येथील श्रीराम चौकातून दुचाकीवरून जात असताना चौकात खड्ड्यात दुचाकी घसरून त्यांचा अपघात झाला. त्यावेळी चोरट्यांनी त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्या गळ्यातील ७५ हजार रुपयांची सोनसाखळी आणि दुचाकीची चावी चोरून नेली.
दरम्यान, कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस परिसरातील सीसीटीव्ही तपासून चोरट्यांचा माग काढत आहेत. सहायक पोलीस निरीक्षक थोरात तपास करीत आहे.