इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
खेड-शिवापूर : सुमारे 30 वर्षे बंद असलेला हवेली तालुक्यातीलकोंढणपूर आणि भोर तालुक्यातील रांजे या गावांना जोडणारा पाणंद रस्ता महसूल विभागाने बुधवारी खुला केला आहे. सुमारे तीन किलोमीटर अंतराचा हा रस्ता खुला झाल्याने या भागातील नागरीकांची मोठी सोय होणार असल्याचे खेड-शिवापूरचे मंडल अधिकारी व्यंकटेश चिरमुल्ला यांनी सांगितले.
मुख्यमंत्री 100 दिवस कार्यक्रम योजना अंतर्गत प्रत्येक खात्याला कृती आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कार्यक्रमांतर्गत महसूल विभागाकडून गावागावांना जोडणारे आणि बंद असलेले पाणंद रस्ते खुले करण्यात येत आहेत. त्यानुसार बुधवारी हवेली तालुक्यातील कोंढणपूर आणि भोर तालुक्यातील रांजे या गावांना जोडणारा सुमारे तीन किलोमीटरचा पाणंद रस्ता खुला करण्यात आला.
जिल्हाधिकारी पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच हवेलीचे उपविभागीय अधिकारी माननीय यशवंत माने व हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा रस्ता खुला करण्यात आला.
हा रस्ता खुला झाल्याने कोंढणपूर ते रांजे या भागातील अंतर्गत वाहतूकीला फायदा होणार आहे. तसेच कोंढणपूर रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे,” असे खेड-शिवापूरचे मंडल अधिकारी व्यंकटेश चिरमुल्ला यांनी सांगितले. हा रस्ता खुला करण्याची कार्यवाही खेड शिवापुरचे मंडल अधिकारी व्यंकटेश चिरमुल्ला, कोंढणपूरचे ग्राममहसूल अधिकारी देवेंद्र शिंदे व गाउडदराचे ग्राम महसूल अधिकारी संकेत बेरड पाटील यांनी केली. सदरचा तीन किलोमीटरचा रस्ता खुला झाल्याने नागरीकांनी आनंद व्यक्त केला.