इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबदल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याच्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले आहेत. याप्रकरणी आता कुणालने माफी मागावी अशी मागणी सर्वत्र होत असून पोलिसांकडे माफी मागण्यास त्याने स्पष्ट नकार दिला असल्याची माहिती समोर आली आहे. आपण फक्त न्यायालयाने आदेश दिले तरच माफी मागू अन्यथा नाही असं प्रत्युत्तर कामराने दिले असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने त्याच्या एका शोमध्ये सादर केलेल्या विडंबनात्मक गाण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आणि वातावरण पेटलं. ही टीका समाज माध्यमावर पसरल्याने शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते, नेते संतापले आणि त्यांनी निषेध म्हणून कुणाल कामराचा शो झाला त्या हॉटेलमध्ये घुसून शो च्या सेटची तोडफोड केली. काल दिवसभर या प्रकरणामुळे राज्यातलं वातावरण तापलेलं होतं. दरम्यान या प्रकरणी पोलीस प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान कुणाल कामराने चार पानांचं एक ट्विट करत त्यातून आपली भूमिका जाहीर केली. मी गाण्यातून जे बोललो तेच अजितदादाही शिंदेंविषयी बोलले होते, असा निशाणा कुणाल कामराने सोशल मीडिया पोस्टवरून साधला. त्यामुळे या प्रकरणांन वातावरण आणखीनच तापणार आहे.
दरम्यान कामराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आणि शिवसेनेवर विडंबनात्मक गाणे सादर केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.