इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : कुख्यात गुंड गजा मारणेला काल सोमवार (दि. 24) पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी 74 ठिकाणी गजा मारणेचा शोध घेतला होता. दरम्यान, गुंड गजा मारणे पोलिसांना स्वतः शरण आल्याची माहिती मिळत आहे.
केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे निकटवर्तीय असेलेले देवेंद्र जोग यांना गजा मारणे टोळीकडून मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी 3 आरोपींना अटक केली होती. तर यातील 2 आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे. गजा मारणेची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर त्याला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. देवेंद्र जोग यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी ओम जिज्ञासू, किरण पडवळ आणि कुणाल तापकीर यांना अटक केली आहे.
काल पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत घेतली होती. त्यावेळी ते म्हणाले की, आमच्या इथे पोलीस स्टेशनला कोणीही आका, बाका, काका येत नाही. तुम्ही गुन्हा करु नका. गुन्हा केलात तर तुमच्या सात पिढ्यांना अद्दल घडेल अशी कारवाई करु असा इशाराही अमितेश कुमार यांनी दिला होता.
संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरु..
गजा मारणे टोळीच्या संपूर्ण राज्यातील संपत्तीची माहिती घेण्याच काम पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसेच संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरु आहे. आरटीओकडून त्यांच्या वाहनांची माहिती घेतली जात असून वाहने जप्त करणार. यासोबतच, त्यांच्या बांधकामाची माहितीदेखील महापलिकेकडून घेणार असून त्यांची बांधकामे पाडणार असल्याचेही आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. तसेच, अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची रविवारी सायंकाळी कोथरुड परिसरातून धिंड काढण्यात आली होती. या टोळीवर मकोका लावण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुणे शहरातील कोथरूड परिसरामध्ये शिवजयंती दिवशी (दि. १९) दुचाकीस्वार संगणक अभियंता देवेंद्र जोग या तरुणाला कुख्यात गुंड गजा मारणेच्या टोळीकडून मारहाण करण्यात आली होती. मिरवणुकीतून दुचाकी काढण्याचा प्रयत्न करत असताना हा वाद होऊन यामध्ये देवेंद्र जोग गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आत्तापर्यंत तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर अद्याप एक जण फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे.