इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
अलिबागः किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीशेजारी असलेली वाघ्या श्वानाची समाधी काढून टाकावी, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज माजी खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. ही समाधी सदृश्य संरचना येत्या 31 मेपूर्वी हटवावी, असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेले पत्र संभाजीराजे यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट केले आहे. या पत्रात म्हटले आहे की, वाघ्या नामक श्वानाचा शिवकालीन इतिहासात कुठलाही उल्लेख किंवा संदर्भसापडत नाही. त्यामुळे अशा प्रकारे कपोलकल्पित श्वानाचा पुतळा किंवा समाधी उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आणि छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे.
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी 2012 मध्ये वाघ्या श्वानाचा पुतळा तिथून काढून फेकून दिला होता. त्यावरून मोठा गदारोळ झाला होता. पोलिसांनी तो पुतळा शोधून काढला आणि त्या ठिकाणी पुन्हा त्या चबुतऱ्यावर बसविला. याप्रकरणी 73 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. या सर्वांची माणगाव सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आता छत्रपती संभाजीराजे यांच्या मागणीमुळे वाघ्या श्वानाच्या समाधीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे