इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : शहरातील नन्हे भागातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे किरकोळ वादातून मामाने 15 वर्षीय भाच्याच्या छातीवर चाकूने वार करुन खून केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील नन्हे भागात शुक्रवारी रात्री घडली आहे. गजानन गजकोश (वय 15, रा. धारावी, कोळीवाड्याजवळ, मुंबई) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मेधनाथ अशोक तपासे (वय 41, रा. मानाजीनगर, नन्हे) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत आरोपी मेघनाथचा मेहुणा मंगेश दत्तात्रय ओव्हाळ (वय 31, रा. कृष्णाईनगर, मानाजीनगर गणपती मंदिराजवळ, नन्हे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गजानन हा मामा मेघनाथ याच्याकडे राहण्यासाठी आला होता. शुक्रवारी रात्री गजाननचा मामाच्या मुलाशी वाद झाला होता. झालेल्या वादातून मेघनाथने भाचा गजाननला पट्ट्याने मारहाण केली. त्यानंतर तेथीलच स्वयंपाकघरातील धारदार चाकूने गजाननच्या छातीवर वार केला. चाकूने भोसकल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. गजाननला जखमी अवस्थेत तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी घटनास्थळी भेट दिली.
त्यानंतर आरोपी मेघनाथला रात्री उशीरा अटक करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत किरकोळ वादातून आरोपी मेघनाथने भाच्याला भोसकून खून केल्याची माहिती समोर आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.