इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
यवत : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांनी ९ लाख ७२ हजार ८१९ अर्ज सादर केले असून अर्जाची छाननी प्रक्रिया मोहीम सुरू करण्यात आली आहे.
हवेली तालुक्यात ३ लाख ५४ हजार ९७, पुणे शहर ७५ हजार ८१७, बारामती ६८ हजार ६२२, इंदापूर ६३ हजार ४८६, जुन्नर ५९ हजार ३१, शिरुर ५७ हजार २८७, खेड ५४ हजार ८०२, दौंड ५२ हजार ३४, मावळ ४६ हजार १३, आंबेगाव ३९ हजार ७५, पुरंदर ३७ हजार ९६७, भोर २९ हजार ४११, मुळशी २७ हजार ४३४ आणि वेल्हा ७ हजार ७४६ असे एकूण ९ लाख ७२ हजार ८१९ अर्ज सादर करण्यात आले असून या पैकी ८५.५७ टक्के अर्जावर निर्णय घेण्यात आला असून ७८.७८ टक्के अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.
प्राप्त झालेल्या अर्जापैकी २ लाख २८ हजार ४७४ अर्ज हे ऑफलाईनरित्या प्राप्त झाले होते. त्यातील १ लाख ८९ हजार ९०२ अर्ज पोर्टलवर भरण्यात आले असून इतर अर्जावरील प्रक्रिया सुरू आहे. छाननी प्रक्रियेत आतापर्यंत ७ लाख ६६ हजार ३९२ अर्ज स्वीकारण्यात आले आहेत, तर ७९५ अर्ज नाकारण्यात आले आहेत. ६५ हजार २६५ अर्ज दुरुस्तीसाठी पुन्हा सादर करण्यासाठी पाठविण्यात आले आहेत. त्रुटी असलेल्या अर्जाबाबत संबंधित महिलांना भ्रमणध्वनी संदेशाद्वारे कळविण्यात येत असून त्याप्रमाणे त्रुटींची पूर्तता करून कागदपत्रे सादर करावे तसेच उर्वरित पात्र महिलांनी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नवीन संकेतस्थळ सुरू
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याकरीता https://ladakibahin .maharashtra.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. या योजनेकरीता यापूर्वी नारी शक्तीदूत अॅपवरुन अर्ज केले असतील त्यांनी पुन्हा या संकेतस्थळावर अर्ज करू नये.
छाननी दरम्यान ज्या अर्जाना त्रुटीपूर्ततेसाठी मान्यता नाकारण्यात आलेली आहे ते अर्ज ज्या ठिकाणाहून लाभार्थ्यांनी अर्ज भरला आहे, तेथूनच पुन्हा भरणे अपेक्षित आहे. म्हणजेच यापूर्वी नारीशक्ती दूत अॅप वरून भरलेले अर्ज पुन्हा त्याच अॅपवरुन सुधारित करुन (एडीट) भरणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत नारीशक्तीदूत अॅप पुढील चार दिवस बंद राहणार असल्याने लाभार्थी अर्ज एडीट करू शकणार नाहीत. परंतु, चार दिवसानंतर सदर अॅप पुन्हा कार्यान्वयीत होणार असल्याने त्या मार्फत अर्जाची पूर्तता करता येईल.
नवीन अर्ज भरण्यासाठी तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळाच्या सर्व्हरचे कामकाज सुरू असल्याने उद्या सकाळपर्यंत त्या लिंक वर अर्ज भरता येणार नाहीत. नव्याने प्राप्त होणाऱ्या अर्जाच्या बाबतीत व ऑफलाइन पद्धतीने शिल्लक असलेले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे कामकाज उद्या सकाळपासून करण्यात येईल. त्यामुळे पात्र महिलांनी काळजी करू नये, असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बाल विकास जामसिंग गिरासे यांनी केले आहे.