Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजकाम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे दहा दिवस शिल्लक असतानाही भाजपचे काही नगरसेवक, आमदार प्रचारापासून लांब आहेत हे लक्षात आल्याने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ‘माननीयांना’ व्यवस्थित काम करा अन्यथा पुढच्या निवडणुकीत उमेदवारी विसरा, दुसऱ्या कार्यकर्त्यांचा विचार केला जाईल असा दम दिला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस हे आज (ता. ३) पुण्यात आलेले असताना त्यांनी कोरेगाव पार्क येथे माजी नगरसेवकांची बैठक घेतली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे आदी यावेळी उपस्थित होते. पुणे लोकसभेची निवडणूक भाजपला एकतर्फी वाटत असली तरी ती अटीतटीची होण्याची शक्यता आहे.

तरीही काही माजी नगरसेवक, आमदार पूर्ण ताकदीनिशी प्रचारात उतरलेले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या नियोजनाच्या बैठकीला ही ३० नगरसेवकांनी दांडी मारली होती. त्यातच आज फडणवीस यांनी आज माजी नगरसेवकांची बैठक घेऊन योग्य शब्दात समज दिली आहे. या बैठकीला बहुतांश सर्व नगरसेवक उपस्थित असल्याचेही समोर आले आहे.

मार्गदर्शन करताना फडणवीस यांनी शिरूर लोकसभेतील हडपसर विधानसभा आणि बारामती लोकसभेतील खडकवासला विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उभे आहेत. त्या भागातील माजी नगरसेवकांनी तेथे जास्त ताकद लावून जास्तीत जास्त मतदान शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला करून घ्या, यामध्ये कोणत्याही पद्धतीने दुर्लक्ष करू नका.

पुण्यातही प्रत्येकाने सोसायटी भेटी, कोपरा सभा, घरोघरी जाऊन वैयक्तीक गाठीभेटीवर लक्ष द्या. पुण्याची जागा आपल्याला मोठ्या मताधिक्याने निवडून आणायची आहे. जे लोकसभेसाठी काम करतील त्यांचाच विचार विधानसभा तसेच महापालिका निवडणुकीत केला जाईल.

जे काम करणार नाहीत त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही, असे फडणवीस यांनी बजावले. या बैठकीत नगरसेवकांना त्यांचे मुद्दे मांडण्यास सांगण्यात आले होते, पण प्रचाराच्या पातळीवरील त्रुटी समोर येत असल्याने नगरसेवकांना थांबवून फडणवीस यांनी थेट मार्गदर्शन सुरु केले, असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.

बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “पुण्यातील माजी नगरसेवकांची बैठक घेतली, यावेळी सर्वजण उपस्थित होते. प्रचारात जे नगरसेवक चांगले काम करत आहेत, त्यांचा सत्कार केला जाईल. जे चांगले काम करणार नाहीत त्यांच्याकडे बघितले जाईल.”

काम न करणाऱ्यांची यादी तयार

लोकसभेचा प्रचार कोण करत आहे? कोण करत नाही? यावर आमचे पूर्ण लक्ष असून, त्याची माहिती आम्हाला वेळोवेळी दिली जात आहे. सध्या १० ते १५ माजी नगरसेवक, काही आमदार काम करत नाहीत. त्यांच्या नावासह आमच्याकडे यादी आहे. त्यांच्यासोबत चंद्रकांत पाटील व्यक्तिगत पातळीवर बोलून समज देतील. त्यानंतरही सुधारणा झाली नाही तर पुढे योग्य ती कारवाई करू, असा इशारा फडणवीस यांनी बैठकीत दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments