इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
लोणी काळभोरः पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या बाजूला ट्रक थांबवून पायी निघालेल्या चालकाला भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याची घटना घडली होती. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील श्रीनाथ मोटर्सच्या समोर 14 जानेवारीला रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या ट्रक चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दुचाकी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सैपन महताब शेख (वय 46, रा. कुमटा, ता. दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. तर अनिश तिवारी (रा. वैदवाडी, वानवडी, पुणे शहर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी हजरत महताब शेख (वय 37, रा. कोयतेवस्ती, पुनावळे, ता. हवेली जि. पुणे मुळ रा. आळगे ता. अक्कलकोट जि. सोलापुर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैपन शेख हे एक चालक होते. शेख अशोक लेलँड कंपनीचा बल्कर ट्रक घेऊन पुणे-सोलापूर महामार्गावरून चालले होते. ते कवडीपाट टोल नाक्याजवळील श्रीनाथ मोटर्स समोर ट्रक रस्त्याच्या बाजूला घेऊन थांबले होते. शेख हे रस्त्याच्या कडेला उभे असताना, पुणे- सोलापूर रस्त्याच्या विरुध्द दिशेनेजाणाऱ्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात हजरत शेख गंभीर जखमी झाले होते. त्यांना ससून येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती बिघडत चालल्याने त्यांना सोलापूर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान 19 जानेवारीला त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, आरोपी अनिश तिवारी याने त्याच्या ताब्यातील मोटार सायकल सार्वजनिक रोडवर बेदरकापणे, धोकादायक रितीने, भरधाव वेगाने, वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करून चालवून सैपन शेख यांना जोरदार धडक दिली. अपघातात जखमी झालेल्या सैपन शेख यांना उपचारासाठी कोणतीही मदत न करता पळून गेला, तसेच त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला, अशी फिर्याद हजरत शेख यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार आरोपी अनिश तिवारी याच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 281, 106 (1), 125 (ब) सह मोटार वाहन कायदा कलम 184, 119/177 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे करीत आहेत.