Tuesday, September 10, 2024
Homeक्राईम न्यूजकदमवाकवस्तीत बंगला फोडून चोरट्यांनी 3 लाख रोख रकमेसह ३७ लाखाचे दागिने केले...

कदमवाकवस्तीत बंगला फोडून चोरट्यांनी 3 लाख रोख रकमेसह ३७ लाखाचे दागिने केले लंपास

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

लोणी काळभोर, (पुणे) कामानिमित्त बाहेरगावी गेल्यानंतर चोरट्यांनी पाठीमागे बंगला फोडून घरातील रोख रकमेसह सुमारे ४० लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील स्टार सिटी परिसरात शनिवारी (ता. 03) दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

याप्रकरणी रविंद्र दत्तात्रय जाधव (वय-६३, मातोश्री निवास, प्लॉट नंबर ७६-७७. लेन नंबर ०३, सिध्दिविनायक पार्क (स्टार सिटी) काळभोर नगर, कवडी माळवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र जाधव हे आरोग्य विभागातून सेवानिवृत्त झाले असून कुटुंबासोबत कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील स्टार सिटी परिसरातील लेन नंबर 3 मधील मातोश्री निवास बंगल्यात राहतात. त्यांनी बंगल्याच्या बाहेर सीसीटीव्ही देखील बसवले आहेत. दरम्यान, रवींद्र जाधव यांच्या नातेवाईकांचे निधन झाले होते. त्यामुळे रवींद्र जाधव हे घर लॉक करून पत्नोसोबत गुरुवारी (ता. १ ऑगस्ट) सोलापूरला गेले होते. सोलापूर येथील माती सावडण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर कुडूवाडी येथील नातेवाईकांकडे शुक्रवारी (ता. २) मुक्कामी थांबले होते.

दरम्यान, शनिवारी (ता. ३) दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या महिलेचा फोन आला की, तुम्ही गावावरुन परत आले का ? तुमच्या घरासमोर खिडकीमध्ये असलेली दुधाची पिशवी अजुन तशीच आहे. त्यानंतर फिर्यादी रविंद्र जाधव यांची पत्नी संगीता यांनी सांगितले की, अजुन आम्ही गावाकडेच आहोत. त्यानंतर शेजारी राहणाऱ्या दोन महिलांनी पाहिले असता, बंगल्याची कडी तुटल्याचे दिसले. व घरातील बेडरुम मधील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसले. त्यानंतर फिर्यादी रविंद्र जाधव यांनी घटनेची माहिती तत्काळ लोणी काळभोर पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके, पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार व त्यांचे सहकारी मोठ्या संख्यने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घरात जाऊन पाहणी केली असता, घरातील गोदरेज कंपनीची तिजोरीच चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. यावेळी बघ्यांनी बंगल्यासमोर मोठी गर्दी केली होती.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, शनिवारी (ता.३) पहाटे पावणे दोन ते अडीज वाजण्याच्या सुमारास चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी रविंद्र जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके करीत आहेत.

दरम्यान, प्रथमता या तिजोरीतून ८० तोळे सोने व ३ लाख रोख रक्कम चोरी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत होती. मात्र पोलिसांनी खात्री केल्यानंतर हा आकडा ५४.५ तोळे सोने व ३ लाख रुपये रोख रक्कम असा समोर आला आहे. त्यामुळे आजच्या बाजारमूल्यानुसार सुमारे 37 लाख रुपयांचे सोने व रोख ३ लाख रुपये असा सुमारे ४० लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments