Sunday, May 19, 2024
Homeक्राईम न्यूजकडाचीवाडीतील वस्त्यांवर अशुद्ध पाणीपुरवठा

कडाचीवाडीतील वस्त्यांवर अशुद्ध पाणीपुरवठा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

चाकण, ता. ३०: कडाचीवाडी (ता. खेड) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येणारा पाणीपुरवठा हा अशुद्ध गाळ मिश्रित आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. येथील आदिवासी ठाकर वस्तीवर तसेच इतर वस्त्यांवर अशुद्ध, गाळ मिश्रित पाण्याचा पुरवठा ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येत आहे. त्यामुळे हे पाणी नागरिकांना पिता येत नाही. आदिवासी ठाकर वस्तीवरील नागरिकांना तसेच इतर वस्त्यावरील नागरिकांना शुद्ध पाणी पिण्यासाठी द्यावे, अशी मागणी आदिवासी ठाकर वस्तीवरील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली.

कडाचीवाडी ग्रामपंचायतच्या वतीने ही पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. ही योजना पाझर तलावावरून तसेच पाझर तलावाच्या खाली विहीर आहे, त्यातून आहे. विहिरीच्या पाण्याने तळ गाठला आहे. तसेच पाझर तलावाच्या पाण्यानेही तळ गाठला आहे. पाझर तलावाचे गाळ मिश्रित, अशुद्ध पाणी नागरिकांना पिण्यासाठी पुरविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. काही नागरिक या पाण्यामुळे आजारी पडत आहेत. याकडे ग्रामपंचायतीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली. सध्या दिवसाआड पाणीपुरवठा होत असला, तरी तो अशुद्ध आहे. म्हणून पिण्याच्या पाण्यासाठी पैसे द्यावे लागत आहेत. ज्यांच्याकडे पैसा आहे, ते पाणी विकत घेत आहेत. ज्यांच्याकडे पैसा नाही, त्यांना पाण्यासाठी दोन किलोमीटर अंतरावर पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे ठाकर वस्तीवरील तरुणांनी याबाबत सुमारे तीनशे नागरिकांच्या सह्यांचे निवेदन ग्रामपंचायतीला तसेच खेड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विशाल शिंदे यांना दिले आहे. यावेळी दादू ठाकर, भिका ठाकर, गोविंद ठाकर, अमोल ठाकर, गुलाब ठाकर, अजय ठाकूर, राजू ठाकर आदी उपस्थित होते.

आदिवासी ठाकर वस्तीवर शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल. याबाबत संबंधित ग्रामपंचायतीला तसेच ग्रामविकास अधिकाऱ्यांना आदेश देण्यात येईल. ग्रामपंचायतीच्या वतीने जो पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तो अशुद्ध आहे. याची प्रत्यक्ष पाहणी केली जाईल. ठाकर वस्तीवरील नागरिकांना शुद्ध पाणी मिळेल, याची दक्षता घेतली जाईल. विशाल शिंदे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, खेड

सध्या नागरिकांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. ग्रामपंचायत नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्यासाठी प्रयत्न करेल. मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने कमी पाणीसाठा असल्याने पाझर तलाव, विहीर यांनी लवकर तळ गाठल्याने पाणीपुरवठा अशुद्ध होत आहे. नागरिकांना पाणी शुद्ध मिळेल, यासाठी पाण्यात पावडर, तुरटी टाकून नागरिकांना शुद्ध पाणी देण्याची व्यवस्था केली जाईल. नीलिमा जाधव, ग्रामविकास अधिकारी, कडाचीवाडी

कडाचीवाडी (ता. खेड): आदिवासी ठाकर वस्तीवरील ग्रामपंचायतीच्या नळपाणी पुरवठा योजनेचे अशुद्ध पाणी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments