Friday, June 14, 2024
Homeक्राईम न्यूजएसटी बस प्रवाशांसाठी खुशखबर...! प्रवासात मिटली सुट्या पैशांची चिंता; 'युपीआय' मुळे तिकीट...

एसटी बस प्रवाशांसाठी खुशखबर…! प्रवासात मिटली सुट्या पैशांची चिंता; ‘युपीआय’ मुळे तिकीट काढणे शक्य

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : एसटीतून प्रवास करताय तर ही बातमी तुमच्यासाठी. एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता तिकिटासाठी सुट्ट्या पैशांची चिंता करण्याची गरज पडणार नाही. एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत प्रवाशांना ‘युपीआय’ प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसादही वाढत आहे.

एसटी महामंडळाने सर्व वाहकांसाठी अँड्रॉइड तिकीट इश्यू मशिन्स (ईटीआयएम) नव्याने सेवेत आणल्या आहेत. या मशिनमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशांऐवजी युपीआय, क्युआर कोड, आदी डिजिटल पेमेंटचा वापर करत तिकीट काढता येते. जानेवारी- २०२४ ते मे- २०२४ अखेर १४ लाख ३२ हजार तिकिटांची विक्री करण्यात आली. त्यामधून एसटीला ५ महिन्यांत ३५ कोटी ८७ लाख १५ हजार रुपयांचा महसूल जमा झाला.

एसटी महामंडळाचा व्यवहारही रोखरहित करण्याच्या दिशेने पाऊल टाकत एसटीने प्रवाशांनाही धावत्या बसमध्ये तिकीट काढण्यासाठी फोन पे, गुगल पे या सारख्या युपीआय पेमेंटची सुविधा उपलब्ध केली आहे. वाहकाच्या अँड्रॉइड तिकीट मशीनवर असलेल्या क्युआर कोडद्वारे प्रवाशांना तिकिटाचे मोजके पैसे डिजिटल स्वरुपात देणे शक्य झाले आहे.

दरम्यान, प्रवाशांना या सुविधेमुळे खिशात रोख पैसे नाहीत तसेच, सुट्या पैशासाठी वाहकासोबत होणारा वाद असे प्रश्न कायमचे मिटले आहेत. या सहज आणि सुलभ तिकीट प्रणालीला प्रवाशांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. जानेवारी २०२४ मध्ये प्रतिदिन केवळ ३ हजार ५०० तिकिटे युपीआयव्दारे काढली जात होती. त्यामध्ये मे २०२४ मध्ये पाचपट वाढ होऊन प्रतिदिन २० हजार ४०० तिकिटे सरासरी काढली जात आहेत. अर्थात, युपीआय पेमेंटव्दारे महामंडळाच्या खात्यावर पैसे जमा होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. जानेवारी २०२४ मध्ये प्रतिदिन १० लाख रुपये होते, आता मे २०२४ मध्ये ४५ लाख रुपये प्रतिदिन झाले आहे.

एसटी महामंडळाकडून प्रवाशांना आवाहन

एसटी बसमधील प्रवाशांनी प्रवासादरम्यान नेहमी वाहकाकडे युपीआय तिकीटाची मागणी करावी जेणेकरून सुट्ट्या पैशावरून होणारे वाद टाळतील. युपीआय पेमेंटव्दारे क्युआर कोडच्या माध्यमातून एसटीच्या सर्व प्रकारच्या बस सेवेमध्ये तिकीट विक्री सुरू केली आहे. जास्तीत जास्त प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments