इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी)चालक व वाहकांना विश्रांती, झोपण्यासाठी सोय नसल्यामुळे काही वेळी एसटीच्या टपावर झोपावे लागत होते. मात्र, आता शिवाजीनगर आगारात ४५ बंक बेड दिल्यामुळे ९० चालक-वाहक यांची आरामदायी झोपण्याची सोय होणार आहे. शिवाय चालक-वाहक यांच्या आरोग्याची काळजी आणि त्यांना आराम मिळण्यास मदत होणार आहे. यासाठी पुण्यातील वृत्ती सोल्युशन यांनी सीएसआर फंडातून शिवाजीनगर आगारात ४५ बंक बेड गाद्यांसह दिले आहेत.
राज्य आणि राज्याबाहेरील अनेक एसटी बस पुण्यात मुक्कामी येतात. मात्र, चालक आणि वाहकांच्या मुक्कामीसाठी अनेक अडचणी येतात. परंतु, या बंक बेडमुळे चालक आणि वाहकांना झोपेसाठी आरामदायी सोय झाली आहे. त्याचे लोकार्पण शुक्रवारी करण्यात आले. यावेळी पुणे विभाग नियंत्रक अरुण सिया, वृत्ती सोल्युशनचे सीईओ वीरेंद्र जमदाडे, शिवाजी बेद्रे, मध्यवर्ती कार्यालयाचे विभाग नियंत्रक ज्ञानेश्वर रणवरे, विभागीय वाहतूक अधिकारी अजय बनारसे, शिवाजीनगरचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक संजय वाळवे उपस्थित होते.