इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
दौंड : दौंड तालुक्यातील परिसरात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच भीमा नदीवरील बंधारा कोरडा पडू लागला असून शेतकऱ्यांसमोर पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच शेतशिवारातील पिकांसाठी व जनावरांसाठी पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे.
याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले की, बंधाऱ्यातील पाणीसाठा जवळपास संपत आला असून पाण्याअभावी अनेक पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. पंपांचे फुटबॉल देखील उघडे पडले असून, पाण्याच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर परिसरातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आवर्तन सोडण्याची मागणी केली आहे. “जर वेळेत आवर्तन सोडले नाही, तर उरलेली उभी पिकेही वाचणार नाहीत. प्रशासनाने त्वरीत लक्ष देणे गरजेचे आहे,” अशी मागणी शेतकरी करत आहेत. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहून तातडीने आवर्तनाचे नियोजन करावे, अशी मागणी सर्वपक्षीय शेतकरी करत आहेत.
गहू, कलिंगड, खरबूज यासारखी पिके शेवटच्या टप्प्यात आहेत. पाणी भेटले नाही तर शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होईल. उन्हाळी आवर्तन लवकर भेटावे अशी आमची मागणी आहे. अशी प्रतिक्रिया प्रगतशील शेतकरी पंकज देविदास बुऱ्हाडे यांनी व्यक्त केली आहे.
तसेच यावर्षी कांदा पीक चांगले आले होते, पण शेवटच्या टप्प्यावर अवकाळी पाऊस, वारे आणि आता पाण्याअभावी पिके नुकसान होण्याच्या मार्गावर आहे. भाव आधीच नाहीत, आता पाणीही नाही. प्रशासनाने तातडीने आवर्तन द्यावं, एवढीच अपेक्षा असल्याचं कांदा उत्पादक शेतकरी दस्तगीर इनामदार, देऊळगाव राजे यांनी व्यक्त केली आहे.