Friday, June 14, 2024
Homeक्राईम न्यूजऊसतोड कामगार न पुरविल्याने ठेकेदाराचे अपहरण; अवघ्या तीन तासात 5 आरोपींना हडपसर...

ऊसतोड कामगार न पुरविल्याने ठेकेदाराचे अपहरण; अवघ्या तीन तासात 5 आरोपींना हडपसर पोलिसांकडून अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

हडपसर, (पुणे) : ऊसतोड कामगार न पुरविल्याचा राग मनात धरून ठेकेदाराला मारहाण करून अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (ता. 8) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर व इंदापूर पोलिसांनी संयुक्तरीत्या कामगिरी करून सदर गुन्ह्याची अवघ्या तीन तासाच्याआत उकल करून 5 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. हडपसर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

राजेश चव्हाण असे सुटका करण्यात आलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. तर मिथुन किसन राठोड (रा. कल्याणी स्कुल जवळ शिवनगरी कॉलणी, मांजरी बु. हडपसर, पुणे), विक्रम लालू जाधव (रा. आनंषाही तांडा पोस्ट मदनसुरी, ता. निलंगा जि. लातुर), अजित बंकट पाटिल व अंकुश धोंडीराम मोहिते (दोघे रा. मु. मुदगडे एकोजी पो. कोकळगाव ता. निलंगा जि. लातुर) व ज्ञानोबा बळीराम वाघमारे (रा. गणपती मंदिराजवळ पंचतारानगर आकुर्डी, पुणे, मुळ गाव, मु.पो. कोरा ता. उमरगा जि. धाराशिव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शनिवारी (ता. 8) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फोन आला कि, राजेश चव्हाण याला 3-4 व्यक्तींनी मारहाण करत अपहरण करून चारचाकी गाडीमधून घेवून गेले आहेत. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी आरोपींना पकडण्यासाठी एक पथक तयार केले होते.

सदर पथकाने घटनास्थळी भेट देवून त्या भागात असलेले सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले. प्राप्त फुटेज वरून गाडी नंबर एमएच 01 एसी 0078 असा गाडीचा नंबर मिळून आला. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे संशयीत मोबाईल नंबर प्राप्त करून त्यांचे लोकेशन प्राप्त केले. आणि पोलीस संशयित आरोपींना पकडण्यासाठी इंदापूर टोल नाका येथे रवाना झाले.

दरम्यान, अपहरण झालेल्या व्यक्तीचा मित्राच्या आधारे पोलिसांनी त्याच्या पत्नीचा शोध घेतला. आणि अपहृत राजेंद्र चव्हाण हे ऊसतोड कामगार असून ते शेतकऱ्यांना ऊसतोड कामगार पुरवितात. गुन्ह्यातील संशयीत इसम यांच्याकडून राजेंद्र चव्हाण यांने ऊसतोड कामगार पुरविण्यासाठी 3 लाख रुपये घेतले होते. पंरतु त्यांनी ऊसतोड कामगार पुरविले नाही. त्याचाच राग मनात धरुन बळजबरीने कारमध्ये बसवून अज्ञात ठिकाणी डांबून ठेवून पैसे वसुल करण्याचे उद्देशाने घेवून गेलेले आहेत. अशी माहिती राजेंद्र चव्हाण यांच्या पत्नीकडून पोलिसांना मिळाली.

हडपसर पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी इंदापूर पोलिसांना संपर्क करून माहिती दिली. इंदापूर पोलिसांना एका खबऱ्यामार्फत माहिती मिळाली कि, संशयित आरोपी हे पुणे सोलापूर महामार्गावरील हॉटेल लिलाज रेस्टॉरन्ट अॅन्ड बार येथे बसले आहेत. त्यानंतर इंदापूर पोलिसांनी मोर्चा हॉटेलवर वळवला. व पाचही आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी करीत आहेत.

ठेकेदाराची गाडीतून सुखरूप सुटका

पोलिसांनी स्कोर्पिओ गाडीची तपासणी केली असता, पोलिसांना गाडीत राजेश चव्हाण यांना डांबून ठेवल्याचे दिसून आले. पोलिसांनी तत्काळ राजेश चव्हाण यांची सुटका केली. यावेळी राजेश चव्हाण यांनी पोलिसांचे आभार मानले.

सदरची कामगिरी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उमेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, जोतीबा पवार, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, अजित मदने, रामदास जाधव, सचिन गोरखे, भगधान हंबडे, अनिरूध्द सोनवणे, अमोल दणके, चंद्रकांत रेजीतवाड, अमित साखरे, कुंडलीक केसकर, इंदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, पोलीस अंमलदार प्रकाश माने, प्रविण शिंगाडे, नंदु जाचच यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments