इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
उरुळी कांचन, (पुणे) : आगामी काळात साजरे होणारे सण, उत्सव,आंदोलने तसेच इतर सामाजिक व राजकीय कार्यक्रमांच्या काळात तेढ निर्माण होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, गुन्हेगारांवर वचक राहावा, यासाठी दंगा नियंत्रणाचा सराव (मॉक ड्रिल) उरुळी कांचन पोलिसांकडून करण्यात आला. हा सराव उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
मंगळवारी (ता. 26) सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास स्वामी विवेकानंद ग्राउंड, उरूळी कांचन येथे दंगा नियंत्रणाचा सराव (मॉक ड्रिल) घेण्यात आला. सण, उत्सव, आंदोलने तसेच इतर सामाजिक व राजकीय कार्यक्रमांच्या काळात संतप्त जमावावर सशस्त्र पोलिसांनी हॅन्ड ग्रेनेड, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत जमावाला पांगण्यासाठी पाण्याचा मारा तसेच लाठीचार्ज या सर्वांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
मंगळवारी उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या वतीने हिंदु व मुस्लिम धर्मियांचे ईद, गुढीपाडवा, रमजान महिना, श्रीराम नवमी, हनुमान जयंती व छत्रपती संभाजी महाराज बलीदान मास या आगामी सणाचे अनुषंगाने स्वामी विवेकानंद ग्राउंड, उरूळी कांचन येथे दंगा काबु योजना रंगीत तालीम घेण्यात आली. दंगा काबु योजना सरावादरम्यान गॅस गन चे 2 टिअर स्मोक सेल फायर करण्यात आले. तसेच 2 हॅन्ड ग्रॅनाईट खर्ची करण्यात आले. सदर दंगा काबु योजना सरावा कामी 1 पोलीस निरीक्षक, 1 सहायक पोलीस निरीक्षक, 2 पोलीस उपनिरीक्षक, 15 पोलीस अंमलदार 16 होमगार्ड यांच्यासह मोठा फौजफाटा उपस्थित होता.
दरम्यान, सरावामध्ये बेकायदेशीर जमावावर वज्र वाहनातून पाण्याचा फवारा मारणे, गॅस गनव्दारे अश्रूधुर नळकांड्या फोडणे, हॅन्ड ग्रेनेड जमावावर फेकणे, जमाव भडकवणाऱ्या, लोकांना ताब्यात घेणे, अशा सर्व कृतींचे प्रात्यक्षिक यावेळी करण्यात आले.