Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजउमेदवारांची प्रचार रॅली आणि डोंबिवलीकरांची वाहन कोंडी !

उमेदवारांची प्रचार रॅली आणि डोंबिवलीकरांची वाहन कोंडी !

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

डोंबिवली – कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. उमेदवार शक्ती प्रदर्शन करत निवडणूक कार्यालय गाठत असल्याने यामुळे शहरात वाहन कोंडीचा ताप डोंबिवलीकरांना सहन करावा लागत आहे.

उन्हाच्या कडक झळांनी नागरीक हैराण झाले असताना या वाहन कोंडीत आगीच्या झळा सहन करत अर्धा अर्धा तास ताटकळत उभे रहावे लागत आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत ऐन वेळेला बदल करण्यात आले आहेत. घरडा सर्कल येथे वाहनांना प्रवेश बंदी देण्यात आल्याने चालकांना मोठा वळसा घालावा लागत आहे. यामुळे चालकांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून आले.

कल्याण लोकसभा निवडणूकीत उमेदवार आपले नशीब आजमावित आहेत. या मतदारसंघात आत्तापर्यंत 19 उमेदवार, प्रतिनिधींना 28 नामनिर्देश पत्र वाटप करण्यात आले आहे. तर 3 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.

मंगळवारी शिवसेना ठाकरे गटाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी आपला उमेदवारी अर्द दाखल केला. यावेळी महाविकास आघाडीकडून शक्तिप्रदर्शन करत भव्य अशी रॅली काढण्यात आली.

या रॅलीमुळे शहरात चार रस्ता, टिळक चौक, टिळक रोड, मंजुनाथ शाळा, शेलार नाका, घरडा सर्कल आदि परिसरात मोठ्या प्रमाणात वाहन कोंडी झाली होती. या वाहन कोंडीचा फटका रुग्णवाहिकांना देखील बसला.

परंतू रुग्णवाहिकेला नंतर तात्काळ रॅलीतून मार्ग काढून देण्यात आला. अर्धा अर्धा तास वाहन कोंडीत वाहने खोळंबल्याने वाहन चालक त्रस्त झाले होते. निवडणूक लढवतात मात्र सर्वसामान्य नागरिकांना का वेठीस धरता ?

असा संतप्त सवाल यावेळी नागरिक कार्यकर्त्यांना करत होते. वाहन कोंडीत वाहन अडकल्याने नोकरदार वर्गाला त्याचा फटका बसला, काही नागरिकांनी रिक्षा तेथेच सोडून चालत जाऊन स्टेशन गाठले. यावेळी मिडीयाला नागरिकांना होणारा त्रास देखील दाखवा असे बोल लगावले गेले.

– शहरात टिळक चौक, मंजुनाथ शाळा आदि ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहन कोंडी झाली. या ठिकाणी कोठेही वाहतूक पोलिस दिसून आले नाही. घरडा सर्कल येथे मात्र वाहतूक पोलिसांची मोठी गर्दी दिसून आली.

– वाहतूक पोलिसांच्या योग्य नियोजनाच्या अभावी डोंबिवलीकरांना वाहन कोंडीचा ताप सहन करावा लागत आहे

– भर उन्हात वाहनांना मार्ग दाखवून वाहतूकीचे नियोजन करताना वाहतूक पोलिसांच्या देखील नाकी नऊ आल्याचे दिसून आले.

– घरडा सर्कल, बंदिश पॅलेस येथे वाहनांना बंदी घालण्यात आल्याने वाहन चालकांना एमआयडीसी परिसरातून वळसा घालून डोंबिवलीत यावे लागत होते. त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments