इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः शहरातील सराफा व्यवसायिकाची उधारीवर दागिने विकत घेऊन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अरविंद सोमाणी (वय ३८ वर्ष, रा. कोंढवे धावडे, खडकवासला) यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमाणी यांचे उत्तमनगर येथील अचानक चौकात सराफाचे दुकान आहे. आरोपी सुधीर निवळकर (वय ४६, रा. शिवणे) याने विश्वास संपादन करून ऑक्टोबर २०२३, ६ फेब्रुवारी आणि ९ फेब्रुवारी २०२५ रोजी एकूण ४०७.१७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ज्यांची किंमत ३६ लाख ७० हजार रुपये इतकी आहे, हे उधारीवर घेतले.
त्यानंतर आरोपीने पैसे देण्यासाठी सतत टाळाटाळ केली. शेवटी, पैसे देण्याच्या बहाण्याने एक चेक दिला, मात्र तो चेक बँकेत पैसे नसल्याने बाऊन्स झाला. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोमाणी यांनी उत्तमनगर पोलिसांत फिर्याद दाखल केली.
पोलिसांनी या प्रकरणी सुधीर निवळकरसह आणखी दोन व्यक्तींविरोधात फसवणूक व चेक बाऊन्स संबंधित कलमानुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक पवार करत आहेत.