इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
कुंडमळा, मावळः मावळ तालुक्यातील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी नदीवरील तीस वर्ष जुना लोखंडी पूल अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या हृदयद्रावक घटनेत चार जणांना आपला जीव गमवावा लागला असून ५१ जण जखमी झाले आहेत. रविवारी दुपारच्या सुमारास ज्यावेळी हा पूल कोसळला, त्यावेळी जवळपास १०० ते १२५ पर्यटक पुलावर उपस्थित होते.
कुंडमळा हे मावळमधील एक निसर्गरम्य स्थळ असून, विशेषतः पावसाळ्यात येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. दुर्घटनेच्या वेळीही अनेक पर्यटक येथे आले होते. स्थानिक प्रशासनाने या पुलाची वाहतुकीसाठी असलेली मर्यादा आणि जीर्ण अवस्था याकडे पुरेसे लक्ष दिले नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. हा पूल प्रामुख्याने स्थानिक दोन गावांना जोडण्यासाठी बांधण्यात आला होता, मात्र या परिसरातील पर्यटन वाढल्याने पुलावरून ये-जा करणाऱ्यांची संख्याही वाढली. दुचाकी वाहनांची पुलावरून होणारी बेफाम वाहतूक आणि एकाच वेळी मोठ्या संख्येने पर्यटकांचे पुलावर थांबणे हे दुर्घटनेचे एक प्रमुख कारण ठरले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
अचानक पूल कोसळल्याने अनेकजण नदीपात्रात अडकले. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) ची दोन पथके, CRPF, पिंपरी चिंचवड पोलीस, आपदा मित्र, PMRDA अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तातडीने मदत व शोधकार्य सुरू केले. जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, दुर्घटनेनंतर तात्पुरती मदत देण्याऐवजी, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरीक करत आहेत.