इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
आळंदीः संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या स्वागतासाठी आळंदी सज्ज झाले आहे. यंदा सुमारे सहा लाखांहून अधिक भाविक या सोहळ्यात सहभागी होण्याची शक्यता असल्याने, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सुरक्षेचे आणि वाहतूक व्यवस्थेचे अत्यंत बारकाईने नियोजन केले आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी शहराच्या काही भागांत विशिष्ट कालावधीसाठी वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध लावण्यात आले आहेत.
आळंदी शहर हे भोसरी, मरकळ, चाकण, महाळुंगे, रांजणगाव या औद्योगिक पट्ट्यातील कंपन्या आणि कामगारांच्या वाहतुकीचा मुख्य मार्ग आहे. दरम्यान, १७ जूनपासून २० जून पर्यंत दिंडीत सहभागी होणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त आणि स्थानिक नोकरदार-रहिवासी वगळता इतर कोणत्याही वाहनांना या कालावधीत आळंदीत प्रवेश दिला जाणार नाही. स्थानिक नागरिकांना गुलाबी रंगाचा पास, तर दिंडीच्या वाहनांना पिवळ्या रंगाचा पास वितरित केला जाणार आहे.
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रमुख चौकांमध्ये पोलीस मदत केंद्रे उभारली जातील, जेणेकरून वारकऱ्यांना कोणतीही मदत तात्काळ मिळू शकेल. गर्दीचा फायदा घेऊन अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुमारे २०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यंदाच्या वारीसाठी पोलीस दलाचे मोठे मनुष्यबळ तैनात करण्यात येणार आहे. पालखी सोहळा शांततेत, सुरक्षितपणे आणि यशस्वीपणे पार पडावा यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे. वारकऱ्यांनी आणि नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून सोहळा यशस्वी करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.