Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजआर्थिक फसवणुकीचे सायबर चोरट्यांना 'क्रेडिट'

आर्थिक फसवणुकीचे सायबर चोरट्यांना ‘क्रेडिट’

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

धनकवडीतील गौतम (वय ३५) एका खासगी कंपनीत कामास आहेत. त्यांना अनोळखी व्यक्तीचा फोन आला. ‘सध्या तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत नाही. कार्ड ब्लॉक करावे लागेल. अन्यथा दंड भरा,’ असे सांगितले.

गौतम यांना बँकेतील एखाद्या कर्मचाऱ्याचा फोन असावा, असे वाटले. समोरील व्यक्तीने त्यांना मोबाईलवर व्हॉट्सअप मेसेज पाठवून एपीके अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार गौतम यांनी मेसेजवर क्लिक करून अॅप डाऊनलोड केले.

त्यानंतर त्या व्यक्तीने मोबाईल स्क्रीन शेअर करून गौतम यांच्या बँक खात्यातून तब्बल २८ लाख रुपये ऑनलाइन काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गौतम यांनी १६ मार्चला सायबर पोलिस ठाणे गाठले. परंतु तोपर्यंत बराच उशीर झाला होता.

अन्य एका घटनेत वाघोली येथील एका ३९ वर्षीय महिलेची अशीच फसवणूक झाली. अनोळखी व्यक्तीने या महिलेला मोबाईलवर पॉप-अप मेसेज पाठविला. महिलेने त्या मेसेजवर क्लिक करताच त्या व्यक्तीने क्रेडिट कार्डची संपूर्ण माहिती घेतली.

त्यानंतर मोबाईल स्क्रीन शेअर करून क्रेडिट कार्डवरून अडीच लाख रुपये ऑनलाइन काढून घेतले. गेल्या दोन दिवसांत घडलेल्या या दोन प्रातिनिधिक घटना. परंतु शहरात अशा आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

सायबर चोरटे नागरिकांच्या बँक खात्यातील रकमेची माहिती घेऊन त्यांना लक्ष्य करीत आहेत. शेअर ट्रेडिंग करण्यास भाग पाडून एरंडवणे येथील एका ३६ वर्षीय महिलेची ८८ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली.

सायबर चोरट्यांनी या महिलेला व्हॉटसअॅपवर लिंक पाठवून बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करून घेतले. शेअर ट्रेडिंगमध्ये चांगला परतावा देऊ, असे सांगून सायबर चोरट्यांनी औंधमधील जयरामन यांना ३८ लाख रुपयांचा गंडा घातला. तसेच, धानोरीतील सजित यांना टेलिग्राम अॅपद्वारे ऑनलाइन टास्कसाठी चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून १९ लाखांची फसवणूक केली.

प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज

सायबर चोरट्यांकडून शहरात दररोज आर्थिक फसवणूक केली जात आहे. परंतु सायबर पोलिस ठाण्यात अपुरे मनुष्यबळ आहे. पोलिस ठाण्यांमध्ये प्रशिक्षित अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी विलंब होत आहे. बँक खात्यातून एकदा पैसे गेल्यास परत मिळतील याची खात्री राहिलेली नाही. सायबर पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे उत्तर मिळते. घटना घडल्यानंतर नागरिकांनीही तातडीने तक्रार करणे अपेक्षित आहे. अशा अपवादात्मक घटनांमध्ये नागरिकांना पैसे परत मिळण्याची शक्यता असते.

पॉप-अप मेसेज म्हणजे काय?

संगणक किंवा मोबाइलच्या स्क्रीनवर पॉप-अप संदेश पाठवून विशिष्ट घटना किंवा इनपुटबद्दल सूचना दिली जाते. ऑनलाइन जाहिराती, सॉफ्टवेअर किंवा सिस्टिमच्या स्थितीबद्दल माहिती दिली जाते. परंतु सायबर चोरट्यांकडून त्याचा गैरवापर केला जात आहे. मोबाईल स्क्रीन शेअरची लिंक पाठवून फसवणूक केली जात आहे.

आर्थिक फसवणुकीच्या घटना (वर्ष २०२३)

३६१ – ऑनलाइन टास्क पूर्ण करण्याचे आमिष

१४९- डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर

६६ – शेअर मार्केट ट्रेडिंग फसवणूक

७८ – केवायसी अपडेटचा बहाणा

१० – ओटीपी शेअर करून

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments