इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : शहरातील वाकडेवाडी भागातून एक बातमी समोर आली आहे. येथे खाद्यपदार्थ विक्रीची गाडी लावण्याच्या वादातून आचाऱ्याच्या डोक्यात तवा घालून खुन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी भागात घडली. विनोद नंदू दिखाव (रा. धानोरी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी नौशाद इक्बाल उर्फ नाना शेख (वय 41, रा. दिघी), अवधेश बहादुर सिंग (वय 33, रा. जलालपूर, गोंडा, उत्तर प्रदेश) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याबरोबर असलेल्या एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुलारी देवी (वय 38, रा. वाकडेवाडी, मुंबई-पुणे रस्ता) यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकडेवाडी एसटी स्थानक परिसरात दुलारी देवी यांनी चहा विक्रीची गाडी लावली होती. त्यांच्या शेजारीच आरोपी नाना शेख, अवधेश सिंग यांनी डोसा विक्रीची गाडी सुरू केली. त्यानंतर या कारणावरुन दुलारी देवी आणि आरोपी शेख, अवधेश सिंग यांच्यात वाद झाला होता. या वादात दुलारी देवी यांचा आचारी विनोद दिखाव याने मध्यस्थी केली होती. त्यातच गुरुवारी सकाळी त्यांच्यात वाद झाला. झालेल्या वादातून आरोपींनी आचारी विनोद याच्या डोक्यात तवा घातला. यात विनोद गंभीर जखमी झाला. त्यानंतर तक्रार दिल्यानंतर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले अधिक तपास करत आहेत.