Friday, June 14, 2024
Homeक्राईम न्यूजअल्पवयीन मुलीने लग्नास नकार दिल्याने घरात घुसून तिच्यावर चाकूहल्ला करणाऱ्या माथेफिरू प्रियकराला...

अल्पवयीन मुलीने लग्नास नकार दिल्याने घरात घुसून तिच्यावर चाकूहल्ला करणाऱ्या माथेफिरू प्रियकराला १० वर्षांची सक्त मजुरी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीला लग्नाची मागणी एका माथेफिरू प्रियकराने केली होती. या माथेफिरूच्या मागणीला अल्पवयीन मुलीने नकार दिल्याने, चिडलेल्या माथेफिरूने मुलीच्या घरात तिच्यावर चाकूहल्ला केल्याची घटना शिरूर तालुक्यात घडली होती. यातील आरोपीला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांची सक्त मजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हे आदेश न्यायाधीश एस. बी. राठोड यांनी दिले आहेत.

अमोल अर्जुन काशिद (वय 25 रा. कोल्हेरे, ता. गेवराई जि. बीड) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीतेने शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार आरोपीच्या विरोधात विनयभंग, खून करण्याचा प्रयत्न व अन्य विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर सदर प्रकार हा एप्रिल २०१९ मध्ये घडला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी शिरूर तालुक्यातील एका विद्यालयात वाणिज्य शाखेत अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. तर आरोपी अमोल काशिद हा पिडीतेच्या इमारतीमध्ये त्याच्या मामाकडे राहण्यासाठी आला होता. दरम्यान, दोघे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. आरोपी अमोल काशिद हा वेळोवेळी पिडीतेला फोन करून तिच्याशी जबरदस्तीने प्रेमसंबंध प्रस्थापित करायला सांगत होता. तसेच त्याच्याशी लग्न करण्यासाठी धमकी देत होता. मात्र, त्याच्या या मागणीला पिडीतेने नकार दिला होता.

दरम्यान, ९ एप्रिल २०१९ ला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आरोपी अमोल काशिद हा अल्पवयीन मुलीच्या घरी आला. तेव्हा त्याने पुन्हा मुलीला लग्नाची मागणी केली. मात्र, मुलीने तेव्हाही ही मागणी अमान्य केली. त्यामुळे चिडलेल्या माथेफिरूने चाकू पिडीतेच्या पोटात व छातीत भोसकून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या चाकू हल्ल्यात पिडीता गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तेथील एका दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेव्हा त्यांनी उपचारादरम्यान ही तक्रार शिरूर पोलीसांना दिली आहे. शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या.

सदर गुन्ह्याचा खटला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयत सुरु होता. या खटल्यात सरकारी वकील अरुंधती ब्रम्हे यांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दहा वर्षे सक्त मजुरी व दहा हजार रुपये दंड, एक वर्ष सक्त मजुरी व दोन हजार रुपये दंड, तीन वर्षं सक्त मजुरी व दोन हजार रुपये दंड व आरोपीने दंड भरल्यानंतर पिडीत यांना चौदा हजार रुपये देणे, अशी शिक्षा सुनावली आहे. हे आदेश न्यायाधीश एस. बी. राठोड यांनी दिले आहेत.

या खटल्यात सरकारी वकील अरुंधती ब्रम्हे यांना शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल शिंदे, सहाय्यक फौजदार विद्याधर निचीत, पोलीस अंमलदार एस बी रणसुर, रेणुका भिसे व आकाश पवार यांची मदत मिळाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments