इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुण्यात अभियंता तरुणाला मारहाण झाल्याची घटना कोथरूड भागातील भेलकेनगर परिसरात घडली होती. ही घटना 19 फेब्रुवारीला रात्री घडली होती. आता याप्रकरणी गुंड गजा मारणे टोळीतील तीन आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
या प्रकरणामध्ये पोलिसांनी गुंड गजानन पंढरीनाथ मारणे (वय 58) याच्याबरोबर रूपेश कृष्णराव मारणे, ओमतीर्थ राम धर्म जिज्ञासू (वय 35), किरण कोंडिबा पडवळ (वय 31), अमोल विनायक तापकीर (वय 35 सर्व रा. शास्त्रीनगर, कोथरूड) आणि बाब्या ऊर्फ श्रीकांत संभाजी पवार (रा. वडगाव रासाई, शिरूर) या सहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार (मकोका) अंतर्गत कारवाई केली. यातील आरोपी रूपेश मारणे आणि बाब्या पवार हे अजूनही पसार आहेत. या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
दरम्यान. ओमतीर्थ राम धर्म जिज्ञासू (वय 35), किरण कोंडिबा पडवळ (वय 31), अमोल विनायक तापकीर (वय 35 सर्व रा. शास्त्रीनगर, कोथरूड) या आरोपींची पोलीस कोठडीची मुदत गुरुवारी (6 मार्च) ला संपत असल्याने यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यातील आरोपी गजानन मारणेला यापूर्वीच न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी दोन मोटारी आणि दोन दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. यावेळी पोलीस कोठडीत असलेल्या आरोपींचा तपास केला असता ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत, अशी माहिती पोलिसांनी आज (6 मार्च) न्यायालयात दिली आहे.
यावेळी, गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकिल विलास पठारे यांनी केला. तर आरोपींच्यावतीने अॅड. विजयसिंग ठोंबरे यांनी बाजू मांडली. त्यानंतर निर्णय देत विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी तीनही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.