Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजअब की बार, भाजप तडीपार; संजोग वाघेरे-पाटील यांच्या प्रचारार्थ पिंपरीत सभा

अब की बार, भाजप तडीपार; संजोग वाघेरे-पाटील यांच्या प्रचारार्थ पिंपरीत सभा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी : “तुमचे एक मत इतिहास घडविणारे आणि देशातील सरकार बदलणारे ठरणार आहे. सर्वसामान्य जनतेने ‘अब की बार, भाजप तडीपार’चा नारा दिला आहे. ‘सत्यमेव जयते’ नव्हे, ‘सत्तामेव जयते’ असे भाजपचे धोरण आहे,” अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पिंपरी आणि मुळशीतील जाहीर प्रचार सभांमधून केली.

मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या वेळी झालेल्या सभेत ठाकरे बोलत होते. आमदार रोहित पवार, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, महाविकास आघाडीचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. अमोल कोल्हे, संजय जगताप, अॅड. गौतम चाबुकस्वार, शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील, जे. एम. म्हात्रे, माउली दाभाडे, जगन्नाथ शेवाळे आदी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, “भाजपला, गद्दारांना, महाराष्ट्र द्वेष करणाऱ्यांना मतदान करायचे नाही, अशी मतदारांची भूमिका आहे. गद्दारांचे सरकार आल्यावर युवकांना एकाही नोकरीची संधी मिळालेली नाही. आमचा गुजरातला विरोध नाही; पण महाराष्ट्रासह आसाम, केरळ, मणिपूर सर्व राज्यांना हक्काचे मिळाले पाहिजे. महिला, गरीब, शेतकरी, युवा सर्वच घटक भाजपवर नाराज आहेत. धमक्या देऊन सरकारे पाडली जातात. दिलेल्या आश्वासनांवर ते बोलत नाहीत.”

शिंदेंकडे पैशांचे गोदाम सापडले होते: ठाकरे

दरम्यान, पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “एकनाथ शिंदे यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाचा छापा पडला होता. त्या वेळी त्यांच्याकडे पैशांचे गोदाम सापडले होते. त्यामुळे ते घाबरले होते. त्यानंतर भाजपने त्यांना ऑफर दिली. आमच्यासोबत या, नाहीतर जेलमध्ये जावे लागेल. त्यामुळे ते उद्धव ठाकरे यांच्याकडे येऊन दाढी खाजवत रडत होते. त्या दबावामुळे गद्दारांना घेऊन भाजपमध्ये गेले.”

रोहित पवार म्हणाले…

• मावळचा मतदार स्वाभिमानी असून गद्दारांना धडा शिकवणार.

• अजित पवार, एकनाथ शिंदे स्वतःच्या सोईचे राजकारण करतात.

• २०१४ नंतर मावळचा विकास झाला नाही, येथील कंपन्या गुजरातला गेल्या.

• फडणवीस यांना फक्त कुटुंब, पक्ष फोडायचे असून, सर्व गुजरातला घेऊन जायचे आहे.

माणिकराव ठाकरे म्हणाले…

• धर्म व जातीचे राजकारण करून भाजप सत्तेत पोहचू पाहात आहे.

• महाविकास (इंडिया) आघाडीला सत्तेवर आणण्याचे जनतेने ठरवले आहे.

• शरद पवार यांनी ज्यांना मोठे केले; तेच त्यांना खाली पाहायला लावत आहेत.

• मोदी, शहा यांनी कट कारस्थान करून पक्ष फोडला, चिन्ह घेतले. त्या वेदना जनतेलाही आहेत.

• ‘पार्थच्या पराभवाचा बदला घेणार’

“अजित पवार हे शरद पवारांना वडिलांसारखे मानत होते. मात्र या वयात ते शरद पवारांना सोडून गेले. आता त्यांना मुलाचा पराभव करणाऱ्यांचाच प्रचार करावा लागत आहे,” अशी कडवट टीका आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केली. पार्थ यांचा पराभव केलेल्या उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी अजित पवार येतात. म्हणजे त्यांची काहीतरी मजबुरी असेल असे सांगून ते म्हणाले, “अजित पवार यांनी पार्थचा पराभव स्वीकारला का नाही, हे माहीत नाही. मात्र यापुढेही त्यांना खूप काही पचवायचे आहे. ते मुलाचा पराभव विसरले असतील, मी मात्र भाऊ म्हणून पार्थचा पराभव विसरलो नाही. पराभवाचा बदला घेण्यासाठी त्याचा भाऊ येथे लढत आहे.”

ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची आहे. गद्दारांना धडा शिकविण्याची वेळ आलेली आहे. मतदार या गद्दारांना धडा शिकवतील. महाविकास आघाडी देईल ती जबाबदारी मी नम्रपणे पार पाडणार आहे. आपण सर्व मिळून शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना यातना देणाऱ्यांचा बदला घेऊ.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments