इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जोरदार धक्के बसत आहेत. परंतु, आता हेच धक्के थांबवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून गळती रोखण्यासाठी, तसेच शिंदे सेनेचे ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी खास प्लॅन तयार करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण पहाता विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल आहे, असे चित्र दिसून येत नाही. खासकरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उद्धव ठाकरेंची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करत आहेत. हे वाढत चालल्याने डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी ठाकरे गट आता सक्रीय झाला आहे.
त्याचाच एक भाग म्हणून माजी खासदार विनायक राऊत यांनी हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर यांना फोन केला आहे. अडचणीच्या काळात पक्ष सोडू नका. जोमाने पक्षांचे काम करा, असे आवाहन राऊत यांनी बाबर यांना केले आहे. लवकरच उद्धव ठाकरे आणि महादेव बाबर यांची भेट होणार आहे. महादेव बाबर शिवसेनेत जाणार असल्याच्या जोरदार चर्चा सध्या सुरु आहेत. मात्र त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांचा निरोप विनायक राऊत यांनी बाबर यांना दिला आहे.