इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
नाशिकः नाशिक मधून एक बातमी समोर आली आहे. येथील पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकीत असल्याने शेतकरी संतप्त आहेत. आज शेतकऱ्यांनी सभापती आणि राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांची गाडी अडवून निषेध केला. वारंवार आश्वासने मिळूनही शेतकऱ्यांचे पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी थेट बाजार समितीसमोर आंदोलन केले.
अधिक माहिती अशी की, पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडे शेतकऱ्यांनी अनेकवेळा मागणी करूनही व्यापाऱ्यांनी अजून पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आमदार बनकर यांची गाडी अडवून जोरदार घोषणाबाजी केली. घोषणाबाजी केल्यानंतर आमदार बनकर यांनी “तुम्हाला एक रुपयाही मिळणार नाही” असे वक्तव्य आंदोलकांसमोर केले. यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन अधिक तीव्र केले.
प्रशासनाकडून केवळ आश्वासने, अंमलबजावणी शून्य
तेथील शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही बाजार समितीसमोर आंदोलन केले होते. त्यावेळी “15 मार्चपर्यंत व्यापाऱ्यांकडून सर्व थकबाकी वसूल केली जाईल” असे आश्वासन शेतकऱ्यांना संचालक मंडळाकडून देण्यात आले होते. मात्र, आता मार्च महिना संपत आला तरीही अजून शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आंदोलन करण्यास उतरले आहेत. प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत आहेत, मात्र प्रत्यक्षात आश्वासनांची अंमलबजावणी होत नाही, अशी नाराजी यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी सरकार आणि महसूल प्रशासनाने या विषयाकडे त्वरित लक्ष द्यावे. व्यापाऱ्यांकडून त्वरित पैसे वसूल करून शेतकऱ्यांना देण्यात यावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. अन्यथा तसे न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.