इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
वडगावशेरी (पुणे): शहरातील नगर रस्त्यावर असलेला विमाननगरचौक वाहतूक पोलिसांनी सिग्नलमुक्त केला आहे. वाहतूककोंडी कमी करण्यासाठी पोलिसांनी चौकात बॅरिकेड लावून काही वाहनांना वळण दिल्यामुळे, वाहतूक सुरळीत झाली आहे. नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गिका आणि विमाननगर फिनिक्स मॉल चौकात सिग्नलमुळे वाहनांच्या रांगा लागून वाहतूककोंडी होत होती. ही कोंडी सोडवण्यासाठी येरवडा पर्णकुटी ते सोमनाथनगर चौकापर्यंतची बीआरटी मार्गिका काढून टाकली. त्यामुळे रस्ता रुंद झाला, मात्र विमाननगर चौकात वाहतूककोंडी सुटत नव्हती. यावर उपाय म्हणून वाहतूक पोलिसांनी चौकात बॅरिकेड लावून काही ठिकाणी वाहने वळवण्यास बंदी केली. विमाननगर चौकातून आणि नगर रस्त्याने येणाऱ्या वाहनांना विमाननगरकडे जाण्यासाठी लष्कराच्या अग्निबाण केंद्रासमोरून ‘यू टर्न’ देण्यात आला आहे.
दरम्यान, पुणे शहर वाहतूक उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले की, विमाननगर चौकातून वाहने वळवण्यास बंदी केल्याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. येत्या काही दिवसांत शास्त्रीनगर चौकातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी शास्त्री चौकातून उजवीकडे कल्याणीनगरकडे आणि सह्याद्री हॉस्पिटलकडे वळण्यास बंदी घालण्याचे नियोजन आहे. कल्याणीनगरकडे जाणारी वाहने रामवाडी पोलीस चौकीसमोरून ‘यू-टर्न’ घेऊन जातील. सह्याद्री हॉस्पिटलकडे वळणारी वाहने वाडिया बंगल्यासमोरून ‘यू-टर्न’ घेतील. त्यामुळे शास्त्रीनगर चौक सिग्नलमुक्त होईल.