इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मध्यप्रदेशः मध्यप्रदेशातील दमोहमधुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पाथरिया नगर येथील एका अंडी विक्रेत्याच्या नावावर दिल्लीमध्ये एक बनावट कंपनी करोडोंचा व्यवसाय करत असल्याचे उघडकीस झाले आहे. या बनावट कंपनीची वार्षिक उलाढाल 50 कोटींहून अधिक आहे. मात्र या कंपनीवर 6 कोटी रुपयांचा जीएसटी थकित असल्याने प्राप्तिकर विभागाने अंडी विक्रेत्याला नोटीस पाठवली आहे. त्याच्याकडून बँक स्टेटमेंट आणि इतर कागदपत्रेही मागण्यात आलेली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशच्या पथरिया नगरमध्ये प्रिन्स सुमन हा राहायला आहे. तो अंडी विकून आपला उदरनिर्वाह करतो. मात्र, प्रिन्स एंटरप्रायझेस नावाची कंपनी दिल्लीत त्याच्या नावावर नोंदणीकृत असल्याचे समोर आले. या कंपनीने 2022 ते 2024 पर्यंत सुमारे 50 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. ही कंपनी चामडे, लाकूड आणि लोखंडाचा व्यवसाय करत होती. मात्र, तिने जीएसटी भरला नसल्याने प्राप्तिकर विभागाने आता प्रिन्स सुमन यांना 6 कोटी रुपयांच्या थकबाकीसाठी नोटीस पाठवली आहे.
पोलिसांत तक्रार दिली
यावेळी, सुमनने सांगितले की, तो कधीही दिल्लीला गेलेला नाही. त्याने आपले पॅनकार्ड किंवा आधार कार्ड कोणालाही दिले नाही, तरीही त्याच्या नावावर बनावट कंपनी स्थापन करण्यात आली आहे. आयकर विभागाकडून नोटीस मिळाल्यानंतर प्रिन्सचे कुटुंब भयभीत झाले आहे. या प्रकरणाची माहिती समोर येताच त्यांनी आयकर विभागाशी पत्रव्यवहार करून पोलिसांत तक्रार दिली आहे.